News & Events
‘समतोल जीवनाचा’
माईंड मास्टर चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित “समतोल जीवनाचा” कार्यक्रमात आहार, ताणतणाव व संगोपन विषयी मौलिक मार्गदर्शन
नगर- डॉ.व्ही.एन.देशपांडे अॅक्सिडेंट हॉस्पिटलच्या सहकार्याने माईंड मास्टर चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित ‘समतोल जीवनाचा’ या जीवन समृद्ध करणाऱ्या कार्यक्रमात डॉ.सुनिता देशपांडे यांचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आहार, ताणतणाव नियंत्रण या विषयावर पुण्याच्या डॉ.दीपलक्ष्मी पेशवे व सुजाण पालकत्व या विषयावर सौ.वसुधा देशपांडे-कोरडे यांचे माऊली सभागृहात व्याख्यान झाले. सर्वांसाठी मोफत असलेल्या या व्याख्यानमालेस नगरकरांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थित पालक इंद्रभान भंडारी व सौ.पद्मा भागवत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. श्रोत्यांना व वक्त्यांना पूर्ण वेळ मिळावा यासाठी सत्कार व उद्घाटन भाषणे टाळण्यात आली.
सुरवातीच्या व्याख्यानात सौ.सुनिता देशपांडे यांनी वजन नियंत्रणासाठी आहाराचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. खाण्याचे तुमच्यावर नव्हे तर तुमचे खाण्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. जगण्यासाठी खावे याला महत्व दिले पाहिजे. नाष्टा, जेवण वेळेवर घेतले तरी तास दोन तासांनी थोडे तरी खाणे आवश्यक असते. घरात केलेले ताजे अन्न सर्वात लाभदायक असते. चहा कमी अथवा बिनदुधाचा घेतला तर उत्तमच अशा अनेक टिप्स त्यांनी दिल्या.
सौ.वसुधा देशपांडे यांनी सुजाण पालकत्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आजचा काळ हा मुलांशी संवाद साधण्याचा असून त्यांना समजून घेऊन त्यांच्या विचारांचे आकलन करून मित्रत्वाचे नाते जोपासावे लागेल. छोट्या कुटुंब पद्धतीमुळे मुले एकाकी व भावूक होतात. असुरक्षिततेची भावना त्यांच्यात निर्माण होते. त्यांना विशिष्ठ वयात विशिष्ठ ज्ञान पालकांनी देण्याची नितांत गरज असल्याचे परखड मत सौ.वसुधा यांनी व्यक्त केले. मुलांचा विकास, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा त्यांच्यातील होणारे बदल याकडे वेळीच पालकांनी लक्ष देऊन वेळीच तज्ञांचा सल्ला घेतला तर किशोर वयात मुलांना योग्य अयोग्य गोष्टींची जाणीव होईल व त्याचा सर्वांगीण विकास घडेल असे सांगितले.
पुण्याच्या डॉ.दीपलक्ष्मी पेशवे यांनी समतोल जीवनाचा यावर मार्गदर्शन करताना सांगितले की आज रोजच प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागते. ताणतणाव, धावपळ याला पर्यायच नसल्याने नैराश्य वाढत आहे. त्यासाठी प्रथम स्वतःला ओळखून स्वतःशी संवाद साधून स्वतःला आहे तसे स्विकारले पाहिजे. वेळेचे नियोजन केले तर बरेचसे ताण व अडचणी कमी होतात. तसेच योग्य व्यायाम, आहार, व ध्यानधारणा रोज केल्याने मिळणारा आनंद पूर्ण दिवस उत्तमरीत्या घालविणे सोपे होते. यासाठी त्यांनी शेवटी दहा मिनिटांचे सोपे ध्यानाचे प्रात्यक्षिक घेतले.
रात्रपाळी करणाऱ्यांनी, प्रवास करणाऱ्यांनी आहाराचे नियोजन कसे करावे? सध्याची मुले ऐकतच नाहीत, वेळेच्या नियोजनासाठी काय करावे असे असंख्य प्रश्न यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी तिन्ही व्याख्यात्यांनी उपस्थितांच्या विविध समस्या, प्रश्नांची उत्तरे दिली.
प्रास्ताविकात डॉ.व्ही.एन.देशपांडे म्हणाले की , डॉ.व्ही.एन.देशपांडे अॅक्सिडेंट व आँर्थोपेडीक सुपर स्पेशालीटी सेंटर मध्ये हाडांच्या विकारांच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असून , दहा ते बारा डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते.सांधे बदल ,बिनटाक्यांची मणक्यांची शस्त्रक्रिया अल्प दरात केल्या जातात. तसेच सामाजिक जाणीव व आरोग्या विषयी जनजागृतीसाठी अशा प्रकारचे प्रबोधन पर उपकर राबविले जातात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार डॉ.देशपांडे यांनी मानले.
डॉ.व्ही.एन.देशपांडे अॅक्सिडेंट हॉस्पिटलच्या सहकार्याने माईंड मास्टर चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित ‘समतोल जीवनाचा’ या जीवन समृद्ध करणाऱ्या कार्यक्रमात डॉ.सुनिता देशपांडेयांचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आहार, ताणतणाव नियंत्रण या विषयावर पुण्याच्या डॉ.दीपलक्ष्मी पेशवे व सुजाण पालकत्व या विषयावर सौ.वसुधा देशपांडे-कोरडे यांचे माऊली सभागृहात व्याख्यान झाले. व्याख्यानमालेस नगरकरांचा भरघोस प्रतिसाद लाभला. ( छाया / जितेंद्र अग्रवाल )