PERMA: आनंदी आयुष्याची पंचसूत्री

अनेकदा असा प्रश्न पडतो, कि कोणतीही गोष्ट करताना आपण ती का करतो? एखादे profession निवडताना आपण ते का निवडलेलं असतं? किंवा कोणताही निर्णय घेताना तो तसा का घेतला जातो? आपण सगळेच जरी वेगवेगळ्या मार्गाने जात असलो तरीही शेवटी गाठायचं ध्येय एकच असतं, ते म्हणजे आनंदाचे आणि सुखासमाधानाचे आयुष्य. असं सुखासमाधानाचं आयुष्य म्हणजे नेमकं काय?
सुख-समाधान ह्यांत दोन शब्द येतात, सुख आणि समाधान. ह्याला इंग्लिशमध्ये शब्द आहेत हेडोनिक happiness म्हणजे सुख आणि युडेमोनिक happiness म्हणजे समाधान. फार वर्षांपूर्वी ह्या दोन संकल्पना मांडल्या गेल्या, ज्या आजही समर्पक वाटतात.
आता हे सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं कि ते घरबसल्या मिळतं?
सुख म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला छान वाटते, पाणीपुरी खाणे, एखादा सिनेमा पाहणे, आवडीचं जेवण, छान झोप, कुठेतरी छान ठिकाणी केलेला प्रवास, लक्झरी, स्वत:ला राजासारखं/राणी सारखं वागवणं. Aristippus ने ही संकल्पना प्रथम मांडली. आणि आपलं सुख नेमकं कशात आहे, ते ओळखून आपण तसं वागायला हवं हेही सुचवलं. श्रीरंग गोडबोलेंनी लिहिलेल्या प्रशांत दामलेंच्या त्या प्रसिद्ध गाण्यात म्हटलंय कि नाही, ‘दान घेताना झोळी हवी ती रिकामी, भरता-भरता पुन्हा थोडी वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं… सुख म्हणजे नक्की काय असतं?’ अगदी तसंच Aristippus ने सांगितलं, कि स्वत:ला सुखी करताना लाजू नको. ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या बिनधास्त करा. आजपुरता, आत्तापुरता, काही क्षणापुरता विचार ह्यातून डोकावताना दिसतो. सुख हे असंच क्षणिक असतं.
हे ऐकायला खूप छान वाटतं. पण दुसरं मन म्हणत असतं असं क्षणिक सुखाच्या मागे धाऊन कसं चालेल? आपण संसारी माणसं, आपल्याला आपल्यानंतर आपल्या मुलाबाळाचं कसं? ही काळजी वाटत असते. क्षणिक सुखापेक्षा आपलं मन मग दीर्घकालीन सुखाकडे धाव घेतं, हे दीर्घकालीन सुख म्हणजे समाधान. मग ह्यांत अनेक गोष्टी येतात. आपण फक्त आपल्या सुखाचा विचार करत नाही, आपल्याला आपल्या माणसांसाठी सुद्धा सुख हवं असतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला खूप छान फिलिंग देऊन जातो. कौतुकाचे शब्द स्फूर्ती देतात. आपलं काम, profession ह्यांत महत्त्वाची भूमिका बजावतं. ते फक्त आपली सुखं मिळविण्यासाठी पैसा देत नाही तर कितीदातरी ते काम हेच सुखाचा, समाधानाचा source असतं. ते पूर्ण झालं आपण केलं ह्यांतच आपल्याला समाधान वाटतं. शांतता वाटते.
ह्या अशा प्रकारच्या समाधानाला म्हटलं गेलं, युडेमोनिक happiness. हि संकल्पना Aristotle ने मांडली.
आता eudemonic आनंद मिळवायचा कि hedonic? हेडोनिक आनंद आकाशपाळण्यासारखा असणार. एका क्षणात वर, दुसऱ्या क्षणात खाली. तर युडेमोनिक दीर्घकालीन. पण मग आपण सतत असं दीर्घकालीन आनंदासाठी क्षणिक आनंद सोडत रहायचा का? कधीतरी त्यांतही मजा असतेच ना?
ह्याचं उत्तर दिलं मार्टिन Seligman ने. त्याने सांगितलेल्या थेरीनुसार आपल्याला सुख आणि समाधान दोन्हीही हवं असतं. त्याचा समतोल साधला जायला हवा. ह्यालाच इंग्लिशमधून म्हटलं जातं well-being. हे दोन्ही मिळालं कि आपली भरभराट (flourishing) होऊ लागते. ह्या भरभराटीसाठी त्याने सुचवलेली पंचसूत्री म्हणजे PERMA. PERMA हे पाच इंग्रजी शब्दांनी तयार झालेलं acronym आहे.
१. P – Positive Emotions (सकारात्मक भावना) आणि Negative Emotions
आपल्याला दोन्ही प्रकारच्या भावना जाणवतात, positive आणि negative. आणि ह्या सगळ्याच तात्पुरत्या असतात. आपण सतत चिडलेले, उदास, दु:खी नसतो. तसंच आपण सतत आनंदात, एक्सायटेड असेही नसतो. आपल्याला सवय अशी असते, कि रोज जाणवणाऱ्या positive भावना आपण दुर्लक्षित ठेवतो तर negative भावना मात्र उराशी कवटाळतो. negative भावनाची तीव्रता कमी करणं आणि positive भावनांचे चान्सेस वाढवणं हे करता येऊ शकतं. सकारात्मक भावना आपण सुखात आहोत असा विश्वास निर्माण करतात. फक्त एवढंच नाही तर आपल्या विचारांची व्याप्ती वाढवणं, आपला आत्मविश्वास वाढवणं, वैयक्तिक क्षमतांचा विकास करणं, coping mechanisms विकसित करणं हे positive emotions मुळे होऊ शकतं (Barbara Fredrickson, 2009). आणि ह्यासाठी काही क्षणिक आनंदासाठीच्या गोष्टी करणं, आताच्या क्षणावर लक्ष देणं (हेडोनिक happiness) फायद्याचं ठरतं.
२. E – Engagement (गुंतलेपण) याचा अर्थ, आपण करत असलेल्या कामात पूर्णपणे रमून जाणे, वेळ कसा गेला कळत नाही अशी अवस्था (flow state). आपण तल्लीन होतो. त्या गोष्टीशी एकरूप होतो. आपण ज्या गोष्टींमध्ये गुंततो त्या गोष्टी बरेचदा आपल्या मुल्यांवर आधारित असतात. आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतात. जिथे तहान-भूकही विसरली जाते, तिथे दु: ख का नाही विसरलं जाणार? गुंतालेपण हे पुढे आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतं.
३. R – Relationships (नाती) मानवी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक: engagement सोबतच गुंतलेला घटक म्हणजे आधार देणारी नाती, भावनिक जवळीक, belongingness. अनेकदा, सगळी सुखं हात जोडून उभी असणारा माणूसही समाधानाच्या वाटेवर कुठेतरी मागे पडतो, कारण अशा जवळच्या नात्यांचा अभाव असतो. माणूस हा मुळातच समाजप्रिय प्राणी आहे. आयुष्यात सुंदर नाती आयुष्य अधिकाधिक समृद्ध करतात. व्यक्ती म्हणून घडविण्याची जबाबदारी ह्या नात्यांची असते. लहानपणापासून निरोगी, निकोप नाती मिळत गेली कि, विचारही आपोआपच बदलत जातात.
४. M – Meaning (अर्थपूर्णता) ह्या सगळ्याच गोष्टी आयुष्याला एक उद्देश देत जातात. जगायचं कशासाठी? कुणासाठी? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं कि जगण्याला रंगत येते. आपल्या आयुष्याचा अर्थ तीन गोष्टींवर अवलंबून असतो, belongingness, contribution आणि coherence (The Practical Atlas, n.d., p. 21). म्हणजेच, समाजाशी किंवा आपल्या माणसाशी जोडले जाण्याची, स्वीकारलं जाण्याची भावना, मी समाजाला काही तरी देऊ शकतो.शकते हि भावना आणि आपल्या आयुष्याचा सुसंगत असा अर्थ लावता येणं. मी नसल्याने काय होणार? ह्या नकारात्मक विचारापेक्षा ‘माझं असणं खूप महत्त्वाचं आहे,’ कुणासाठीतरी, कशासाठी तरी उपयोगी पडणारं आहे, हा विचार जगण्याचं बळ देऊन जातो. काहीतरी मिळविण्याची उर्मी देऊन जातो.
५. A – Accomplishment (साध्य / यश) आयुष्यात काहीतरी साध्य करण्याची भावना ही व्यक्तीच्या सुखसमृद्धीसाठी तितकीच महत्त्वाची असते. एखादं ध्येय ठरवणं, त्यासाठी प्रयत्न करणं आणि ते पूर्ण झाल्यावर मिळणारं समाधान व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतं. साध्य केलेल्या गोष्टी मोठ्या असायलाच हव्यात असं नाही; छोट्या-छोट्या यशांमधूनही पुढे जाण्याची प्रेरणा मिळत राहते. “मी करू शकतो” हा विश्वास निर्माण होतो. हा विश्वास व्यक्तीला पुढील आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ देतो आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध बनवतो.
हे पाचही घटक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. ह्यांत positive Emotions हा भाग सुखासाठी तर आयुष्याचा अर्थ समजणे, engagement, accomplishment ह्या गोष्टी समाधानासाठी आवश्यक ठरतात. नातेसंबंध मात्र सुख-समाधान दोन्ही ठिकाणी महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
सुखासमाधानाच्या आयुष्यासाठी PERMA पंचसूत्री अतिशय महत्त्वाची ठरू शकते.
वसुधा देशपांडे- कोरडे

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *