करियर आणि व्यक्तिमत्व ह्यांचा खूप जवळचा संबंध असतो. व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्हाला इतरांपासून वेगळे करणारे तुमचे गुणधर्म. हे गुणधर्म प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात.व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व आणि तुमचं महत्व ठरवत असतात.
व्यक्तिमत्वामध्ये तुमचे गुण, अवगुण, स्वभाव-वैशिष्ट्ये, दिसणं, एखाद्या गोष्टीला सामोरे जाण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, आचरण अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. थोडक्यात, रंगीबेरंगी कागदाच्या तुकड्यांनी बनवलेलं कोलाज जसं असतं, तसंच आपलं व्यक्तिमत्त्व असतं.
आपल्यातल्या काही गोष्टी ह्या जन्मापासून असतात. त्यांची देणगीच मिळालेली असते. तर काही अनुभवातून आकाराला येतात. किंवा मुळातच असणाऱ्या गोष्टींना अनुभवामुळे पैलू पाडले जातात. हे पैलू पाडणे म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकसित करणे. ह्यात शिक्षण महत्वाची कामगिरी पार पाडते. करीयर निवडताना व्यक्तिमत्वाचा विचार केला गेला तर आपलं व्यक्तिमत्व करियरला अर्थ मिळवून देऊ शकतं आणि करियर व्यक्तिमत्वाला झळाळी.
आपलं व्यक्तिमत्व ओळखताना सगळ्यांत आधी आपण इतरांसारखे असू शकणार नाहीत हि गोष्ट लक्षात घ्यायला हवी. व्यक्ती म्हणून आपल्याला वेगळे करणारे गुण कोणते, ह्याचा शोध घ्यायला हवा. आता आपल्याला हे गुण विकसित करायचे आहेत. मग त्यांत कदाचित, चांगली कल्पनाशक्ती असेल, किंवा चांगली स्मरणशक्ती असेल, लोकांत मिसळण्याची क्षमता असेल किंवा एकच काम निष्ठेने, सातत्याने करण्याची तयारी असेल. ते ओळखायला हवेत. त्याच्या आधारावरच पुढचं शिक्षण घ्यायला हवं. आपले कौशल्य हा व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. तरीही, कौशल्य म्हणजेच व्यक्तिमत्व नाही. त्याला आपल्या दृष्टीकोनाची, स्वभाव वैशिष्ट्यांची जोड मिळणं आवश्यक असतं. समजा, एक पत्रकार होण्यासाठी आवश्यक कौशल्य म्हणजे लेखन कौशल्य, संवाद कौशल्य पण फक्त हि कौशल्य असल्याने माणूस पत्रकार होऊ शकत नाही. त्याबरोबर चौफेर व्यक्तिमत्त्व, काहीसा निगरगट्टपणा परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणे, धीट असणे ह्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. ह्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतात.
आपण एखाद्या गोष्टीला कशाप्रकारे सामोरे जातो, हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो. खूप जास्त तणाव घेणारी व्यक्ती, तणाव देणाऱ्या ठिकाणी फारशी सुखात राहू शकणार नाही. विचार करा, एखादी भित्री, तणावात राहणारी व्यक्ती जर पोलीस खात्यात असेल तिला ते काम कितपत झेपू शकेल? किंवा एखादा गरम डोक्याचा सेल्समन असेल तर तो ते काम किती आवडीने करू शकेल?आपण आपल्यातल्या कोणत्या स्वभाव-वैशिष्ट्यांना मुरड घालू शकतो? हा विचारही व्हायला हवा. त्यावरच एखाद्या ठिकाणी आपण कसे adjust होणार हे ठरणार आहे. जेव्हा कामाच्या ठिकाणी adjust होण्यासाठी फार त्रास घ्यावा लागत नाही तेव्हा आपण काम चांगल्याप्रकारे करू शकतो. आनंदात राहू शकतो.
कामाची जागा म्हणजे आपलं दुसरं घरच असतं. तिथे जाणं, थांबणं, काम करणं जेवढं जास्त आनंददायक वाटेल, तेवढं जास्त यश ठरलेलं. आपल्या आवडी, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व एकमेकांमध्ये गुंफलेले असतात. त्यांच्यावरच आपल्या कामाचा आनंद बेतलेला असतो. म्हणूनच, करियर निवडताना ह्या तीनही गोष्टींना सारखंच महत्व द्यायला हवं.