मोठं झाल्यानंतर तुला कोण व्हायचंय?” हा प्रश्न जवळपास सगळ्याच लहान मुलांना विचारला जातो. आणि सुरुवातीला ‘आई किंवा बाबा’ हे उत्तर हळूहळू डॉक्टर, इंजिनियर, सीए, आणि अशाच काही वेगवेगळ्या उत्तरात बदलत जाते.
काय व्हायचं हे ठरवताना बरेचदा आई-बाबा किंवा घरातल्या मोठ्या माणसांचा सल्ला घेतला जातो. आई वडिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नाव मिळविले असेल तर तेच कार्यक्षेत्र निवडले जाते. म्हणजे, आई-बाबा डॉक्टर असतील तर मुलंही डॉक्टर होतात, किंवा व्हावं असं आई-बाबांना वाटत असतं. बिझिनेसमन असतील तर मुलाने बिझिनेस सांभाळावा अशी त्यांची इच्छा असते. करियर म्हणून कोणतं क्षेत्र निवडायचं, ह्यासाठी अशा इच्छा किंवा सल्ले ह्यांचा आधार बरेचदा घेतला जातो. त्या जोडीला, हुशार मुलांनी (जास्त मार्क्स पडलेले हुशार ) सायन्स साईड घ्यायची आणि कमी मार्क्सवाल्यांनी कॉमर्स किंवा आर्ट्सला जायचं असा पायंडाच पडलेला आहे. हे खरंच योग्य आहे का?
करियर म्हणजे फक्त नोकरी करून पैसे कमावणे नाही. त्या बरोबर यश, आनंद आणि कामाचं समाधान ह्या गोष्टीही अभिप्रेत आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणं ह्या सारखं दुसरं सुख नाही.
“Choose a job you love, and you will never have to work a day in your life.” Confucius
त्यासाठीच, करियर निवडताना आपल्याला आपली आवड (इंटरेस्ट), आपल्या क्षमता (aptitude), आपली बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व ह्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक ठरते.
आता अप्टीटयूड आणि इंटरेस्ट बद्दल जाणून घेऊया.
इंटरेस्ट म्हणजे आवड. करियर निवडताना आवड लक्षात घेणे आवश्यक असते. आवड म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट. गाणे असेल, चित्र काढणे असेल किंवा एखादा खेळ असेल, वाचन असेल. आवडीची गंमत अशी आहे निर्माण होऊ शकते. एखाद्या गोष्टीसाठी मिळालेले प्रोत्साहन अशी आवड निर्माण करू शकतं. तसेच, एखाद्या गोष्टीसाठी रागावणं नावड निर्माण करू शकतं किंवा असलेली आवड कमी करू शकतं.
अप्टीटयूड म्हणजे अभिवृत्ती. एखादी गोष्ट करण्याचे तुमचे कौशल्य. म्हणजे गाण्यासाठी आवाज, सुराची जाण. चित्र काढताना लागणारे कसब ह्याला अभिवृत्ती म्हणता येईल. ह्याच गोष्टी लेखनाच्या, गणिताच्या बाबतीतही दिसून येतात. एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी सुद्धा अभिवृत्तीची गरज असते. अभिवृत्ती चाचण्यांमधून आपल्या मुलाचे कौशल्य जाणून घेता येते. मुलाचे कौशल्य ओळखून निवडलेले करियर त्याच्यासाठी आनंद आणि यश दोन्हीही खेचून आणू शकते. एखाद्या गोष्टीची आवड आहे म्हणजे कौशल्य असेलच असे नाही. तसेच कौशल्य आहे म्हणून आवड असेलच असेही नाही.
आपल्या मुलाचे हे कौशल्य आणि आवड थोडक्यात मुलाचा कल,आई-बाबांना निरीक्षणातूनही ओळखता येऊ शकते. ओळखताना अडचण येते ती आपल्या अपेक्षांची. बरेचदा आई-वडिलांच्या अपेक्षा एवढ्या जास्त असतात कि त्यापुढे मुलाची आवड लक्षातच येत नाही. त्यात बरेचदा आई-वडिलांच्या स्वप्नांचीही भर पडते. अप्टीटयूड टेस्ट आणि इंटरेस्ट टेस्ट करायची ती ह्याच्यासाठीच.
आय. क्यू, मुळे आपल्या पंखांत बळ किती आहे हे कळते तर अप्टीटयूड टेस्ट आणि इंटरेस्ट टेस्टमुळे अवकाश ठरवता येते.
कार्यक्षेत्र कोणतंही असू देत, मेहनत करावी लागतेच. मग ते काम शिक्षकाचे असेल किंवा डॉक्टरचे. एक डॉक्टर होऊन यश मिळू शकते तसेच शिक्षक होऊनही किंवा हॉटेल काढूनही मिळते. तसेच, अपयश मिळण्याची शक्यताही सगळ्या क्षेत्रांमध्ये सारखीच असते. कार्यक्षेत्र जर आवड आणि कौशल्य विचारात घेऊन निवडलं तर मेहनत आपणहून आवडीने घेतली जाते. पुढे जाण्याची इच्छा, जिद्द मुलांमध्ये निर्माण होते. समाधान मिळते.आई-वडिलांच्या इच्छेने निवडलेले करियर कदाचित, पैसा मिळवून देईल पण समाधान दूर पाठविले जाते. काही वर्षांनी कामाचा कंटाळा येऊ लागतो आणि ताण मागे लागतो. बरेचदा, अभ्यासक्रम पूर्ण करतानाच अडचणी जाणवू लागतात, ते अप्टीटयूड आणि इंटरेस्ट लक्षात न घेतल्यामुळे.
करियर निवडणं हे जोडीदार निवडण्याइतकंच कठीण काम आहे. त्याच्याशी तुमचे सूर जुळायला हवेत तर आयुष्याचं सोनं होतं. दिसणं, पैसा, जात ह्या गोष्टी खूपच वरवरच्या ठरतात. तसंच, तुमच्या कामातून तुम्हाला आनंद मिळायला हवा. मग आयुष्य सुंदर होतं. समाधान मिळतं. त्या पाठोपाठ यश आपोआपच येतं.