जजमेंटल होण्याची गरज आहे का??

“तिचं काय, बरं असेल, मॅगी केलं की झालं काम!” एक ओळखीच्या काकू गप्पा मारता-मारता मला माझ्या मैत्रिणीबद्दल म्हणाल्या. “का हो काकू, मॅगी का?” मी आपलं विचारलं.. “मग काय,बरोब्बर नऊ वाजता निघते ती कामावर. काय होतं नऊ पर्यन्त? आमचेतर नाश्ते पण होत नाहीत.पोरांकडे बघायचं नाही काही नाही..” खरंतर माझ्या ह्या मैत्रिणीची दोन्ही मुलं अभ्यासात हुशार आणि गुणी आहेत. “अहो, पण ती लवकर उठते. प्लॅनिंग असतं. नवरा-मुलंही मदत करतात. गुणी आहेत अगदी.” मी मैत्रिणीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. “तर, मी पण उठतेच ना. तर माझी मुलं नाहीत वाटतं गुणी? ” काकू ऐकायला अजिबातच तयार नव्हत्या.
असंच एकदा दुसरी मैत्रीण घरीच असणाऱ्या मैत्रिणीबद्दल म्हणाली, “ कामच काय आहे तिला, स्वयंपाक करायचा आणि बसायचं टीव्ही किंवा मोबाईल पाहत. माझ्यासारखी ऑफिस आणि घर दोन्ही कुठे बघायचंय.” “अगं तिला काय काम आहे, हे तिने तुला कुठे सांगितलंय पण..” माझ्या मनात विचार येऊन जातो.
घरीच (गृहिणी) असणं किंवा कामावर जाणं ह्यांत तशी तुलना करण्याची किंवा चांगलं-वाईट ठरविण्याची गरज आहे का? प्रत्येकाचा वेळ, काम तितकंच महत्त्वाचं नाही का? एखादी बाई जॉब करते म्हणून लगेचच ती घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष करते असं असतं का, किंवा एखादी जॉब करत नाही म्हणजे ती अगदीच रिकामटेकडी असते का? पण दुसऱ्यांना जज करण्याची सवयच जडलेली असते काही जणांना. जॉब करणं किंवा घरात असणं ही फक्त काही उदाहरणे झाली. एखादीचे लग्न जमत नाही, किंवा लग्न करायचं नाही असे ठरवलंय, एखाद्याला मूल होत नाही, काही कारणाने सासू-सुनेचे जमत नाही, नवरा कुठे लांब राहतो, असे एक ना अनेक प्रसंग असतात. तिखट-मीठ लावून चाखले जातात. बरं हे दुसऱ्याबद्दल असणारं जजमेंट तिसऱ्याला सांगायचं. म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल बोललं जातं तिला त्याचा काहीच फायदा होत नाही. अनेकजण ह्या अशा गप्पांमध्ये तासंतास घालवतात. आणि मग म्हणतात, “मी कुठे रिकामटेकडी आहे, तिच्याबद्दल बोलायला…मला हजार कामं..”
पूर्वी मला अशा लोकांचा खूप राग येत असे. तुम्हाला आहेत ना कामं, मग ती करा. ते लढतायेत त्यांच्यापरीने, त्यांना मदत करता येत नसेल तर नावं तरी ठेवू नका, असं वाटे. आता काही वर्षांपासून अशा लोकांची दया येऊ लागलीये. त्यांची दुखरी जखम दिसू लागलीये. कळतंय की कुठेतरी त्यांचं सॉलिडच बिघडलंय. आणि त्यांना मदतीची नितांत गरज आहे.
-वसुधा देशपांडे-कोरडे

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *