नारसिसस स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेलं ग्रीक पौराणिक कथेतले पात्र. असं म्हणतात की नारसिसस स्वत:च्या प्रेमात एवढा रमलेला होता की त्यापुढे तो तहान-भूक ही विसरला होता. त्याचा अंत ह्या प्रेमापोटीच झाला.
ह्या नारसिसस वर एकोचं (Echo) प्रेम होतं. पण एको ला देवाने शाप दिला होता. तिला फक्त कुणीही बोललेले शब्दच पुन्हा उच्चारता येत असत. त्यामुळे तिच्या भावना तिला शब्दांत व्यक्तच करता आल्या नाहीत. नारसिसस ने तिला नाकारलं. तरीही ती त्याच्या मागे जात राहिली. एको चा अंत नारसिसस च्या प्रेमात झाला.
नारसिससच्या नावावरूनच शब्द आला, नारसीसीझम, स्वत:वर खूप जास्त प्रेम करणारी व्यक्ती. narcissistic पर्सनॅलिटी डिसोरडर नावाचा एक पर्सनॅलिटी डिस ऑर्डर आहे. अनेकांना ऐकून, वाचून माहिती असेल. प्रत्येक वेळी disorder असेलच असं नाही, पण अनेकदा काही narcissistic गुणविशेष मात्र दिसून येतात. जेव्हा असे लोक आजूबाजूला असतात तेव्हा जगणं अवघड होत जातं.
जसा नारसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो, तसंच एको च्या नावावरून शब्द आलाय echoism. Craig Malkin ने हा शब्द पहिल्यांदा वापरला. अजुनही हा official diagnosis नाही.
echoistic लोक नारसिसिस्ट गुण असणाऱ्या लोकांच्या अत्याचाराला फार लवकर बळी पडतात.
स्वत:च्या कोणत्याही गरजा बोलून दाखवणं, पूर्ण करणं टाळतात. आपण कुणाला तरी आवडतो, हे सगळ्यांनाच आवडतं. पण echoists लोक आवडून घेण्यासाठी काहीही करायला तयार असतात. आपण त्या व्यक्तीला खरंच आवडतोय का? हा विचारच करत नाहीत. ते फक्त देत राहतात. अगदी मदतही मागत नाहीत.
त्यांना सवयच असते, स्वत:ला वेळ न देण्याची. स्वत:वर प्रेम न करण्याची. ह्या लोकांच्या बाबतीत मला जाणवलेलं एक निरीक्षण म्हणजे हे लोक नीट आरशात सुद्धा पाहत नाहीत. इतरांच्या बाबतीत हे जेवढे मऊ असतात, प्रेमळ असतात तेवढेच स्वत:च्या बाबतीत कडक.
मला अजून एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे, हे नेहमी कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनासारखे असतात. “माझीच आई , माझीच बहीण,’ ते कसंही वागले तरी मी त्यांना माफ केलं पाहिजे, मी त्यांच्याशी कसं लढू? असा प्रश्न ह्यांना सतत सतावतो. टोकाचा क्षमाशीलपणा त्यांच्याजवळ असतो. हे फक्त बहीण. भाऊ. नवरा ह्यांच्या बाबतीत मर्यादित नसतं. तर सगळ्यांच्याच बाबतीत ते क्षमाशील असतात. क्षमा करून एक मर्यादा आखून घ्यावी स्वत:साठी. पण अत्याचार सहन करणाऱ्या ह्या लोकांना तेही जमत नाही.
एकदा एक मुलगी म्हणाली, “मला माहितीये, मी माफ करायला हवं. मी करतेही. पण सगळं थोडे दिवसांनी परत तसंच होतं.” खरं आहे ते. हे एक दुष्टचक्र असतं. तुम्ही वारंवार अडकत जाता. गुंतत जाता. तुम्ही माफ करता त्याला ते स्वत:चा अधिकार समजू लागतात.
गेल्या काही दिवसांत असे अनेक लोक काउन्सेलिंगसाठी आले. जाणवणाऱ्या समस्या होत्या anxiety, स्वत: वर सतत शंका, निर्णय घेता न येणं, एकटे आहोत, असहाय्य आहोत असं सतत वाटणं आणि त्याबरोबर नैराश्य वाटणं. जेवढे कौंसेलिंग साठी आले त्यापेक्षाही जास्त आजूबाजूला आहेत असं जाणवलं. हे फक्त बायकांमध्येच जाणवतं असं नाही, पुरुषांमध्येही असू शकतं.
अनेकदा, ह्या echoist लोकांचा मुक आक्रोश जाणवतो, ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्या व्यक्तींसाठी, अगदी पौराणिक कथेतल्या एको सारखाच.
काल-परवा एक २०-२२ वर्षांची मुलगी सांगत होती. ‘.. पण बाबा पाहतच नाहीत माझ्याकडे.’ कधी कुणी ३०-३५ वर्षांची यशस्वी झालेली स्त्री सांगत असते, “.. पण आई माझ्या यशाचं कधीच कौतुक करतच नाही.” आणि मग त्यांना स्वत:ला सिद्ध करायचं असतं, आई समोर, बाबांसमोर. अनेकजण असेच प्रियकर, प्रेयसी साठी वेडे-पिसे होतात. “मी काय करू म्हणजे त्यांना मी दिसेन? माझा आवाज पोहोचेल???” असे न विचारलेले अनेक प्रश्न ह्या सिद्ध करण्यामागे दडलेले असतात. वाटत असतं, “I am not enough.”
नारसिसस वरच्या प्रेमापोटी एको चा अंत झाला. तसा प्रत्येकवेळी व्हायलाच हवा असं नाही. आजुबजूला असणाऱ्या अशा echoist ना स्वत:वर थोडंसं प्रेम करायला शिकवता येतं . फक्त दुसऱ्यांनी बोललेलं न उच्चारता स्वत:च्या आवाजात स्वत:ला व्यक्त करायला त्यांना शिकवता येतं. स्वत:साठी काही सीमा आखायला शिकवता येतं. शापातून मुक्ती मिळू शकते. त्यासाठी, प्रयत्न मात्र करायला हवेत.
“जब मिले थोड़ी फुर्सत
खुदसे करले मोहब्बत
है तुझे भी इजाज़त
करले तू भी मोहब्बत..”
(फोटो: google)
वसुधा देशपांडे-कोरडे
माइंडमास्टर कौंसेलर्स, पुणे
९२२५५०५३६९