‘माझ्याशी सगळ्यांनी चांगलंच वागायला हवं,’ ज्यावेळी हा विचार मनात येतो, त्यावेळी आपल्याशी वाईट वागणाऱ्या लोकांचा राग येऊ लागतो. वाटतं, “मी तर चांगली आहे, त्यांना काहीच नाही केलं तरीही माझ्याशी असं का वागतात?” आपल्याशी भांडणाऱ्या लोकांचा राग आपल्या डोक्यात बसतो. ह्याला कुठेतरी, “मी खूप चांगली आहे,” ह्या विचाराचाही आधार असावा.
आपल्या मनातला आपल्या चांगुलपणाबद्दलचा दृढ विश्वास असतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपलं चांगलं वागणं नावाजलेलं असतं. ह्या चांगल्या वागण्याचाच मग गर्व चढू लागतो. ‘मी किती चांगली आहे,’ हा पाढा आपण स्वत:शीच गाऊ लागतो. मनात पक्कं करतो, ‘मी चांगली वागते ना, मग माझ्याशीही सगळ्यांनी चांगलंच वागायला हवं.’ पण एखादा भेटतो, आपल्याशी चांगलं न वागणारा. आपल्या वागण्याला नावं ठेवणारा. आपल्या चांगुलपणावर संशय घेणारा. आणि आपण हादरून जातो, ‘असं झालंच कसं?’ मन सांगत असतं, ‘नाही माझं कुठेच चुकलेलं नाही.’ आपण मनाशी हे वारंवार ताडून पाहिलेलं असतं. ‘तरीही ती व्यक्ती आपल्याशी वाईट वागली, भांडली’, हि गोष्ट सहनच होत नाही. मग त्या व्यक्तीचाच राग येऊ लागतो. आपलाच चांगुलपणा आपल्या आड येऊ लागतो.
‘मला वाईट म्हणाले, माझ्याबाबतीत गैरसमज करून घेतला’, एवढंच डोक्यात फिरत राहतं. अतिचांगुलपणा अंगी असणाऱ्या लोकांचं बरेचदा असं होतं.
अरे हो, तुम्ही चांगलेच आहात. चुकला नाहीत. पण त्या व्यक्तीलाही अधिकार आहेच ना, हवं तसं वागण्याचा. आपलं मत जपण्याचा. पण हे त्यावेळी पटतंच नाही.
ह्या अशा विचारांची मुळे बरेचदा लहानपणात दडलेली असतात. आपल्या सर्वाना लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी योग्य किंवा अयोग्य, चूक किंवा बरोबर ह्यांत विभागण्याची सवय असते. त्यातूनही एखादी गोष्ट योग्य म्हणजे पूर्णपणे योग्यच असायला हवी हे मनावर बिंबवलेले असते. त्यातूनच ० tolerance ची सवय जडते. मग माझ्याकडून काहीच चुकू नये, माझ्याशी कुणीच वाईट वागूच नये, मला कधी रागच येऊ नये, मला कुणी रागावूच नये ह्या विचारांचा जन्म होऊ लागतो. हे विचार तार्किक दृष्ट्या अगदीच टाकाऊ असतात. म्हणूनच जास्त त्रासदायक असतात.
मग ह्यांवर उपाय काय, तर आपल्याला त्रासदायक ठरणारी गोष्ट इतरांमध्ये नाही, तर आपल्यातच (आपल्या विचारांत) हे स्वीकारणे. विचार बदलले कि आपोआपच भावना बदलतात. विश्वास ठेवण्याच्या जागा बदलतात. बदलाला सुरुवात होते.