Obsessive Compulsive Disorder

“As good as it gets”, मेलविन नावाचा एक लेखक, कॅरोल नावाची एक वेट्रेस ह्यांच्यातली सुंदर प्रेमकथा. ह्या प्रेमकथेबरोबरच मेलविनचं त्याच्या शेजाऱ्याशी, सायमनशी आणि सायमनचा कुत्रा वेरडीलशी जुळलेलं नातंही खूप सुंदर दाखवलेलं आहे. सुरुवातीलाच नजरेत येतं ते मेलविनचं एका ठराविक पद्धतीने राहणं, रस्त्यावरून चालताना भेगेवर पाय पडणार नाही, ह्याची काळजी घेणं, रोज ठराविक रेस्टोरंटमध्ये ब्रेकफास्टसाठी जाणं, ठराविक ठिकाणी बसणं, सोबत आपले disposable dish, चमचे आणि gloves ठेवणं, तिथल्या एका ठराविक वेट्रेससाठी आग्रही असणं. थोडक्यांत त्याला ओबसेसिव कंपलसीव डिसऑर्डर असणं.
Obsessive Compulsive Disorder, मध्ये एखादा विचार (उदाहरणार्थ, ‘मला इन्फेक्शन होईल’), हा सतत डोक्यात येत राहतो. हा विचार एवढा त्रास देतो. की त्यातून सुटण्यासाठी, माणूस काही गोष्टी करायला सुरुवात करतो. जसं की, वारंवार हात धुणे, टोकाची स्वच्छता करणे. आता अशी भीती कुणालाही वाटू शकते आणि स्वच्छता कुणीही करतं. पण बरेचदा, हे विचार बाजूला सारणं, दुसरीकडे मन रमवणं शक्य होतं. Ocd असताना मात्र हे अवघड जातं.जर स्वच्छता केली नाही तर तणाव येऊ लागतो. तासन्तास ह्यांत घालवले जातात. हा विचार मनात येऊच नये, ह्यासाठी सगळी धडपड चालू असते. तो विचार आणि त्याला बाजूला सारण्यासाठीच्या क्रिया माणसाच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करू लागतात.
बरेचदा, ocd असणाऱ्या माणसालासुद्धा आपल्या ह्या विचाराला कसलाही आगापिछा नाही, हे समजत असतं. असे लोक अनेकदा चेष्टेचा विषय ठरतात. काहीवेळेस, त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना खूप वैतागतात.
Ocd ची सुरुवात बरेचदा, लहानवयांतच होते. तर काहीवेळेस किशोरवयांत, तारुण्याच्या सुरुवातीला होते. तणाव देणाऱ्या परिस्थितिमध्ये वाढलेला दिसून येतो. Ocd वर औषधोपचार उपलब्ध आहेत. औषधोपचारांच्या जोडीला मानसोपचारही दिले जातात. ह्यादोन्हीचा परिणाम म्हणून ocd मॅनेज करता येऊ शकतो. त्याच्यासोबत राहता येऊ शकतं. Cognitive Behaviour थेरपी, विशेषत: Exposure and response prevention therapy ह्यासाठी उपयोगी पडते.
As good as it gets मध्ये मेलविनच्या आयुष्यात अनेक घटना घडतात. शेजारच्या सायमनच्या कुत्र्याची अचानक पडलेली जबाबदारी आणि नंतर त्याचा लळा, कॅरोलचं (मुलाच्या आजारपणामुळे) रेस्टॉरंटमध्ये नसणं, सायमनशी जुळलेलं नातं, नंतर कॅरोल आणि सायमनसोबतचा प्रवास, कॅरोलचे नाराज होणं, ह्या घटना त्याला त्याचा रिस्पॉन्स पॅटर्न तोडायला भाग पाडतात. शेवटी, कॅरोलसोबत चालताना, मेलविन भेगेवर पाय देतो आणि त्याला त्याचे काहीच वाटत नाही, असं दाखवलं आहे. पण हा सिनेमा आहे, हे विसरून चालणार नाही. Ocd असणाऱ्या माणसाचं आयुष्य शेवटी मेलविनसारखं झालं तर ह्यापेक्षा चांगलं दुसरं काहीच नाही. This is what as good as one gets…
-वसुधा देशपांडे-कोरडे

माइंडमास्टर कौंसेलर्स, पुणे.

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *