अगदी दोन महिन्यांवर परीक्षा आलेली असते. आपल्याला कळत असतं की, आता एकेक दिवस महत्त्वाचा आहे. तेवढ्यात आपल्या एका मित्राचा फोन येतो. “येतोस का संध्याकाळच्या शो ला?” मित्र विचारतो. जाऊन-येऊन, खाऊन, भटकून 4-5 तास सहज जाणार आपण विचार करतो. पण, मित्र खूप दिवसांत भेटलेला नाही, परीक्षेच्या काळात नंतर कुठे मूवी पहाणार? जाऊ या. दुसरं मन सांगतं. त्या मनाला मित्रांशी होणाऱ्या गप्पा, मूवी असा छान स्ट्रेस फ्री वेळ हवा असतो. ते तिकडे धाव घेऊ लागतं. तुम्हाला खुणावू लागतं. तुम्ही विचार करता, 4-5 तास म्हणजे दिवस नाही. रात्री आल्यावर बसू करत. आणि मग तुम्ही खुश होता. निघता. निघताना, फिरताना, मुवी पाहताना अधून-मधून अभ्यासाचा विचार डोकावतो. शहाणं मन सांगतं ‘दोन महिनेच आहेत बरं का! त्यातला एक दिवस गेला.’ तुम्ही चक्क दुर्लक्ष करता.
भरपूर कामं पडलेली असतात. पटापट उरकायची असतात. तेवढ्यात नॉटिफिकेशन चमकते. कामं उरकायची आहेत. शहाणं मन सांगतं. दोन मिनिटांनी काय होणार आहे, वेडं मन म्हणतं आणि मग दोन ऐवजी पांच, दहा, पंधरा मिनिटे मोबाइल स्क्रोल करण्यात जातात. कधी-कधी एक तास सुद्धा. शहाणं मन आठवण करून देत असतं. पण आपण रमलेलो असतो.
दांत थोडा-थोडा दुखत असतो. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्हाला वाटतं. पण ती डेंटिस्टची खुर्ची, ती निरनिराळी साधनं आणि त्या वेदना, डोळ्यांपुढे येतात. तुम्ही पेन किलर घेता. मग तासाभरांत म्हणता, “बरं वाटतंय आता, जाऊ दे नंतर बघू.”
आपलं वजन वाढतंय आपल्या लक्षात येतं. जरा खाणं कमीच करायला हवं जाणवतं. पण समोर अगदी गरमागरम समोसे असतात. आपण म्हणतो, “जाऊ दे उद्यापासून बघू.”
असं अनेक गोष्टींच्या बाबतीत होतं. तुमचं एक मन तुम्हाला काम करून टाकायला सांगत असतं तर दुसरं ते काम काम टाळण्यासाठी अनेक कारणं देतं. तुम्ही कारणं देणाऱ्या मनाचं ऐकता. कोणत्यातरी छान वाटणाऱ्या, कमी तणाव देणाऱ्या कामांमध्ये महत्त्वाची पण स्ट्रेस देणारी, कधी बोरिंग कामं करायची राहूनच जातात. सकाळी उठताना जसा अलार्म वारंवार snooz वर टाकावा तसे आपल्या मनातले कामाचे, अभ्यासाचे, व्यायामाचे, डायटिंगचे विचार आपण snoozवर टाकत असतो. थोड्या-थोड्यावेळाने ते आपल्या डोक्यात येतंच असतात. मग डेडलाइन जवळ येऊ लागतात. काम manage करणं अवघड वाटू लागतं. आपल्याला अजूनच स्ट्रेस येऊ लागतो. त्याबरोबर अपराधीही वाटू लागतं. उगाच वेळ घालवला, असं वाटू लागतं.
बरेचदा, मला ‘तणाव आल्याशिवाय काम करताच येत नाही,’ असं कारणही आपण देतो. आणि त्यामागे आपली टाळाटाळ लपविण्याचा प्रयत्न करतो.
अनेकजण ह्या अशा विचारांना बळी पडलेले असतात. खूप तणाव घेऊन वावरत असतात. खरंतर त्यांना तणाव टाळायचा असतो. तो टाळण्यासाठी आधी अनेक कारणे सापडलेली असतात. आपल्याला ते बालगीत माहिती असेल, ‘घड्याळात वाजला एक, आईने केला केक. केक खाण्यात एक तास गेला पण मी नाही अभ्यास केला..’ अशीच काहीशी ही कारणे असतात.
तणाव आपण जेवढा टाळू तेवढा तो वाढत जाणार आणि सारखा आपल्या डोक्यात वाजत राहणार. हे आपल्या लक्षातच येत नाही. बरेचदा हयातून बाहेर पडायचे असते. पण कसे ते कळतंच नाही.
हयातून बाहेर पडायचं असेल तर आपण हे का करतोय, ते लक्षात घ्यायला हवं. आता वरची उदाहरणे पहिली तर लक्षात येईल की आपण जेंव्हा एखादी गोष्ट टाळतो, तेंव्हा ती आपल्याला anxious करणारी असते, नाहीतर ती केल्याने होणारे परिणाम खूप उशिरा जाणवणार असतात उदा- डायटिंग. किंवा आता समोर असणारी गोष्ट चटकन आनंद देणारी असते (समोसा, मुवी). वाट पाहण्यापेक्षा तुम्ही तो आनंद मिळविण्याला प्राधान्य देता. आपल्यापुढे ध्येय निश्चित नसते, काहीवेळेस एखादी गोष्ट खूप अवघड, आवाक्याबाहेरची वाटत असते. मग टाळण्याचा सोपा मार्ग निवडला जातो.
जेंव्हा एखादं न आवडणारे काम करायचे असते, तेंव्हा आपण स्वत:शीच म्हणतो, “किती अवघड/बोर/त्रासदायक काम आहे. आणि इथेच काम टाळण्यासाठी असंख्य कारणं सापडायला सुरुवात झालेली असते.
आता ह्या विचारांतून प्रयत्नपूर्वक बाहेर पडता येतं. दुसरं मन सांगत असतंच ना. त्याचं ऐकण्याची सवय लावता येते. इथे विचार थोडे बदलावे लागतात. म्हणजे, ‘काम अवघड आहे खरं, पण कसं करता येईल?’ हा विचार करणं. त्याला छोट्या छोट्या भागात विभागणं. नेमकं काय अवघड जातंय, का अवघड जातंय हा विचार करणं आणि उपाय शोधणं. ह्या गोष्टी करता येऊ शकतात. कधी हातून होणाऱ्या चुकांची, त्या चुकांच्या परिणामाची आधीच भीती वाटत असते. अशावेळी, चुका झाल्याच तर काय-काय करता येऊ शकेल ह्याची उपाययोजना करून ठेवा. चुकांना घाबरण्यापेक्षा त्या होऊच नयेत म्हणून काम लांबणीवर टाकण्यापेक्षा त्यांची जबाबदारी घेतली की, काम उरकता येतं. आणि अनुभवही येतो.
‘काम बोरिंग आहे, म्हणून आधी उरकले तर नंतर आरामात हवे ते काम करता येईल.’ असा विचार काम उरकून टाकायला मदत करू शकतो. चटकन आनंद मिळविण्यापेक्षा भविष्यातल्या आनंदाचा विचार आपल्याला काही गोष्टींना मुरड घालायला, मोह आवरण्यासाठी उपयोगी पडतो.
हे सगळं जाणीवपूर्वक करता येतं.
1. आपल्या हातून होणाऱ्या चुकांना घाबरू नका.
2. रोजच्या कामांची यादी तयार करा.
3. ध्येय निश्चित करा.
4. आपल्या आयुष्यातली प्रधान्यक्रम लक्षात घ्या.
5. जी गोष्ट करायची आहे त्याची छोट्या-छोट्या भागांत विभागणी करा. आणि ते पूर्ण झाल्यावर स्वत:लाच शाबासकी द्या.
6. गोष्टी पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. करायच्या आहेत तर कशा करता येतील? हा विचार करायला हवा.
7. वास्तवाला धरून विचार करायला शिका. बरेचदा, चिंतेमुळे आपण एखाद्या क्षुल्लक गोष्टीला खूप जास्त महत्व देतो. आणि घाबरून टी गोष्ट करायची टाळतो. वास्तववादी विचार आपल्याला ह्या चक्रातून बाहेर काढू शकतात.
आणि एवढं करूनही कधी ढकललंच पुढे काम, तरीही स्वत:ला माफ करा आणि परत नव्याने सुरुवात करा. मदतीसाठी आम्ही आहोतच.
-वसुधा देशपांडे-कोरडे
M.A. (Clinical Psychology), M.Sc.(Psychology)(UK), MBA (HR)(UK)
माइंडमास्टर कौंसेलर्स, पुणे.