नारसिसस स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेलं ग्रीक पौराणिक कथेतले पात्र. त्याच्या नावावरूनच शब्द आला, नारसीसीझम.
नारसीसीझम- स्वत:वर अतिशय प्रेम करण्याची वृत्ती.
स्वत:वर प्रेम करा असं हल्ली वारंवार सांगितलं जातं. आत्मविश्वास, सेल्फ एस्टिम वाढविण्यासाठी ते गरजेचं असतंही. पण नारसीसीझम म्हणजे सेल्फ एस्टिम नव्हे. स्वत:वरचे हे प्रेम फारच वरवरचे असते. स्वत:बद्दलच्या अनेक मोठेपणाच्या कल्पनांमधून जन्मलेलं. सत्यापासून लांब.
स्वत:वरच्या प्रेमाचा अतिरेक होऊ लागतो. स्वत:पुढे सगळी दुनियाच शून्य वाटू लागते. ‘मी भारी आहे’ ह्या विचाराऐवजी ‘फक्त मीच काय तो भारी आहे!’ हा विचार बळावू लागतो.
आपण कसे स्पेशल आहोत, कौतुकास पात्र आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू होतो. जिथे आपलं कौतुक नाही, तिथे थांबणे अवघड होऊन जाते. दुसऱ्या कुणाचे कौतुक झाले की जाळफळाट होऊ लागतो. कुणी चुका दाखवल्या की राग येतो. आपल्यावर प्रेम करणारे इतर कुणी दिसतंच नाहीत. मग नातं जोपासताना अडचणी येतात. दुसऱ्यांच्या भावना समजावून घेता येतंच नाहीत. नारसीसीझम मुळे माणूस एकटा होत जातो. अनुयायी भरपूर असतात पण मित्र मात्र नाही.
ह्याची सुरुवात खरंतर लहानपणीच होते. सात वर्षांपर्यंतची सगळीच मुलं सेल्फ सेंटरड असतात. त्यानंतर मात्र हे थोडं कमी व्हायला हवं. त्याची जागा स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याने घ्यायला हवी.
काही वेळेस मुलांना ‘आपण सर्वगुणसंपन्न आहोत असं वाटू लागतं. ‘कौतुक होणं’, हा हक्क वाटू लागतो. आपण फार काही मोठं काम नाही केलं तरीही आपलं कौतुक व्हावं अशी इच्छा असते. मित्र-मैत्रिणींबाबत कायम असूया मनात असते. वागण्यात उद्धटपणा येऊ लागतो.
त्याचवेळी चिडचिड, गोष्टी परफेक्ट जमत नाहीत ह्याची जाणीव होऊन येणारा तणाव, नैराश्य, कौतुक न झाल्यामुळे येणारा राग, भावना हाताळता न येणं ह्या गोष्टी जाणवू लागतात.
मुलं नारसिसिस्ट होण्यामध्ये आई-वडील फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मुलांकडे अजिबातच लक्ष दिलं जात नसेल किंवा मुलांचं आयुष्य खूप जास्त प्रमाणात कंट्रोल करण्याचा प्रयत्न होत असेल तर मुलं नारसिसिस्ट होण्याचं प्रमाण जास्त असतं. फक्त यश मिळालं तरच कौतुक अन्यथा नाही, अशी भूमिका असेल तर मुलं नारसिसिस्ट होऊ लागतात. त्याबरोबर आईवडिलांकडून बरेचदा, मुलाचे भरपूर लाड केले जातात. त्याला रागवायचे नाही, ‘नाही’ म्हणायचे नाही असा जणू नियमच असतो. जेंव्हा असे प्रमाणाबाहेर लाड होऊ लागतात तेंव्हाही मुलं नारसीसीझम कडे वळू लागतात.
काहीवेळेस कौतुक करताना आपण मुलांना लेबल लावत असतो. लेबल फक्त वाईटच असतं असं नाही. काहीवेळेस, “तुझ्याएवढं हुशार कुणीच नाही,” किंवा “तुझ्या वयाच्या बाकीच्या मुलांना तुझ्यासारखं जमतच नाही,” किंवा, ‘तू gifted आहेस,’ अशी काही वाक्ये आपण नकळत बोलून जातो. आपल्या दृष्टीने आपली मुलं नेहमीच स्पेशल असतात. पण त्याचा परिणाम म्हणून नकळत ‘माझ्या एवढं चांगलं कुणीच नाही’, हे मुलांच्या मनात ठसवले जाते.
ग्रीक पौराणिक कथेमध्ये स्वत:वरच्या प्रेमापोटी नारसिसस चा अंत झाला. नारसिस्टिक लोकांचे काहीसे असंच होतं. स्वत:वर असलेलं निस्सीम प्रेम कायमच प्रगतीच्या आड येतं. मोकाळेपणाच्या आड येतं. म्हणूनच हे वेळीच लक्षात घ्यायला हवं.
-वसुधा देशपांडे-कोरडे
M.A. (Clinical Psychology), M.Sc.(Psychology)(UK), MBA(HR)(UK).
माइंडमास्टर कौंसेलर्स, पुणे