मिहिका अडीच- तीन वर्षांची होती तेंव्हाची गोष्ट. ती तिच्या बाबासोबत कुठेतरी बाहेर गेली होती. अखंड बडबड करण्याची तिची सवय बाबाला माहिती होती. म्हणून तिच्या बोलण्याला ‘हो/नाही’ ह्याशिवाय फारसं काही बोलायचं नाही. मनावर घ्यायचं नाही अशी त्याची पद्धत. त्या दिवशी मात्र तो जरा काळजीत पडला. मिहिका ‘यश’ असं नाव सारखं घेतीये आणि ती बाबाशी नाही तर ‘यश’ शी बोलतेय असं त्याच्या लक्षात आलं. त्याने विचारलं, “काय गं पिल्लू कोण हा यश?” “तो माझा फ्रेंड आहे. मलाच दिसतो, आता घरी जातोय. बाय यश’!”मिहिका म्हणाली. आता तर त्याला अजूनच काळजी वाटली. घरी आल्यावर त्याने आधी मला हा प्रसंग सांगितला. तिला आजच डॉक्टर कडे नेउयात म्हणाला.
मला आठवतं, मलाही असे काल्पनिक मित्र होते, अगदी ९-१० वर्षांची होईपर्यंत होते. काल्पनिक मित्र हा खरंतर एक आधार होता.
बऱ्याच मुलांना असा काल्पनिक मित्र असू शकतो. त्याचं नाव असतं. तो अगदी खऱ्या मित्रासारखाच वागतो, गप्पा मारतो. काहीवेळेस एखादी बाहुली, टेडी बेअर किंवा कोणते तरी खेळणे असते ज्याच्याशी मुलं तासंतास बोलतात. रिसर्चनुसार २-७ वर्ष वयोगटातल्या ६५% मुलांना असे काल्पनिक मित्र असू शकतात (Marjorie Taylor, २००८ ). त्यातले ३७ % मुलं अदृश्य(खेळणे नसणाऱ्या) असणाऱ्या मित्रांशी बोलतात.
आपले मूल (मुलगा/मुलगी) असे अस्तित्वातच नसणाऱ्या कुणाशी तरी बोलतंय म्हटल्यावर आई-बाबांच्या डोक्यात नाना शंका येतात. मुलाला काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे का? एकटेपणा आलाय का? हे असं बोलणं वाढत तर जाणार नाही, त्याला भास तर होत नाहीयेत? अशाच अनेक शंका-कुशंका डोक्यात येतात. पण असं काहीही नसतं. एक तर आपण कल्पना करतोय हे मुलांना कळत असतं. ती तसं संगतातही.
एकुलते एक मूल असेल तर हे प्रमाण जास्त असतं का? तर असं काही नाही. अभ्यासानुसार असं सिद्ध झालंय कि ज्या मुलांना imaginary friends असतात, ती मुलं जास्त सोशल, आनंदी, कुणाशीही पटकन जुळवून घेणारी असतात. त्या बरोबर अशा मुलांचा शब्दसाठा भरपूर असतो आणि अशी मुलं सृजनशील असतात. स्वत:ची करमणूक स्वत:च करून घेऊ शकतात. (Jerome Singer, Dorothy Singer, १९७१). म्हणजेच imaginary friends चा एकुलते एक असण्याशी संबंध नाही. (Jerome Singer, Dorothy Singer, १९७१).
मुलांना जर असा कुणी काल्पनिक मित्र असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. घाबरायचं नाही तर उडवूनही लावायचं नाही. त्यांच्या ह्या मित्राला आपणही त्यांच्या बरोबरीने एन्जोय करायचं. ऐकून घ्यायचं. जमल्यास त्या मित्राबद्दल अजून प्रश्न विचारायचे. मुलांना बोलतं करायचं. काहीवेळेस मुलं आपण केलेला पसारा, चुका त्या मित्राच्या नावावर खपवतात. अशावेळी, “तो नाहीच, उगाच खोटं बोलू नकोस”, असं म्हणण्याऐवजी त्या काल्पनिक व्यक्तीचं अस्तित्व स्वीकारून मुलाशी बोला. काहीवेळेस थोडसं ठाम राहून बोलता येतं. म्हणजे, “त्याने सांडलं असेल पाणी पण तू ते साफ करायला हवंस.”
मुलं मोठी होतात तसतसे हे imaginary friends बरेचदा गायब होतात. पिअजे च्या सांगण्यानुसार मुलं लॉजीकली विचार करू लागली कि (७ व्या वर्षाच्या पुढे) असे फ्रेंड्स आपोआपच गायब होतात. पण एका अभ्यासानुसार मात्र अगदी १०-१२ वर्षाच्या मुलानाही imaginary friends असतात, (Marjorie Taylor, २००६). काही किशोरवयीन मुलांच्या दैनंदिनीत तसा उल्लेख आढळला आहे. तरीही घाबरण्याचे कारण नसते कारण त्यांच्या रूपाने मुलं स्वत:सोबत सतत एक मदतीचा हात घेऊन वावरत असतात. स्वत:मध्येच मित्र घेऊन वावरतात. रिसर्चनुसार असे सिद्ध झाले आहे कि imaginary friends असणारी मुलं हि कोणत्याही दु:खातून चटकन बाहेर येणारी तसेच क्रिएटीव आणि सोशल असतात. (Siffge-Krenke, I. April 1997). त्यांचे असे मित्र म्हणजे खऱ्या मित्रांची replacement नसते.
अशी मुलं जेंव्हा मोठी होतात तेंव्हा काय होतं?
ज्या लोकांना लहानपणी काल्पनिक मित्र होते अशा व्यक्ती खूप छान पद्धतीने काल्पनिक गोष्टी, कविता रचतात असे आढळून आले. (Robert Kavanaugh, Charles Schaefer,२००७). त्यातले काही स्वत:पुरते लिहिणारेही असतात.
सारा हॉजेस, अडेले कोह्यानी आणि मार्जरी टेलर(२००२-२००३) ह्यांच्या अभ्यासानुसार जवळपास ४२% कथालेखक-कवी ह्यांना असे imaginary friends होते. कदाचित, गोष्टीतल्या काल्पनिक व्यक्ती imaginary friendsच्या माध्यमातूनच येत असाव्यात.
दुसरं म्हणजे ज्यांना imaginary friends होते असे लोक समोरच्या माणसाची बाजू अधिक चांगल्या प्रकारे (Empathetic) समजून घेऊ शकतात, असेही दिसून आले. काल्पनिक व्यक्तीशी संवाद साधताना त्या व्यक्तीच्या बाजूने विचार केला जातोच. म्हणजेच एकाच गोष्टीचा अनेक अंगाने विचार केला जातो.
थोडक्यात, कोणत्याही वयात imaginary friends असले तरी घाबरण्याचे कारण नाही, कल्पना आणि वास्तव ह्यांतला फरक मात्र लक्षात यायला हवा.