23-24 वर्षांच्या मुलाचे वडील. रडवेले झालेले. “मॅडम , हा काहीच करत नाही हो. नुसता बसलेला असतो. घडघड बोलत नाही. मनात कुढतो का? जिवाचं बरं-वाईट करेल का? भीती वाटते.” वडील सांगत होते. “मी काहीही करायला तयार आहे, पण तो हसला पाहिजे. अॅक्टिव राहिला पाहिजे. laundry आहे माझी. तो कधीच येत नाही तिथे. १० वीच्या पुढं शाळा शिकला नाही. मध्ये एका मुलीवर प्रेम आहे म्हणाला आम्ही साखरपुडा करून दिला. तिच्याशी बोलतो. माझ्याशी एक शब्द बोलत नाही. काय करावं, समजत नाही.” वडिलांनी एवढं सगळं सांगितल्यावर मुलाशी बोलले. तो आत आला आणि पर्फ्यूमचा स्ट्रॉंग वास नाकात घुसला. बोलल्यावर लक्षात आलं. कोणत्याच इच्छा नाहीत, ध्येय नाही, स्वप्नं नाहीत.. कारण त्यांची गरजच त्याला वाटत नाही. दिवसभर फक्त insta बघत बसतो. मला म्हणाला “काय करू मी दुकानात जाऊन? तिथे कामाला माणसं आहेत. मोठा भाऊ सगळं बघतो. शिवाय आमची ३ घरं आहेत, गाडी आहे, हे सगळं माझं आणि भावाचंच आहे. आता लग्न होणार आहे, होणारी बायको कमावते. आम्ही (म्हणजे त्याचे वडील) तिला बिजनेस सुरू करून देणार आहोत. मी काम केल्याने किंवा न केल्याने काही फरक पडत नाही. बाबांना मागितलं की सगळं मिळतं.”
—-
हा एक मुलगा नाही. अशी अनेक मुलं आहेत. २३-२४ व्या वर्षी अंगात असलेली धमक, काम करण्याचा उरक सगळं वाया घालवणारी. फक्त मागण्या करणारी. एका मुलीचा हट्ट असा की मला डॉक्टरच व्हायचं. बरं ह्यासाठी त्यामुलीला १२ वीला फक्त ४०% जेमतेम मिळाले. neet मध्ये ५०. आता असे मार्क्स असताना अॅडमिशन कसं मिळणार? बरं हे नशिबाने मिळाले का? नाही मुलीने वर्षभर पुस्तकांकडे पाहिलंही नाही; पण मुलीऐवजी आई-वडील काळजीत. काळजी कसली, तर तिला डॉक्टर व्हायचं होतं, आता होता येणार नाही,म्हणून ती दु:खी आहे. आता तिला हवं ते देण्यासाठी आम्ही काय करायला हवं?
—-
१२-१३ वर्षांचा मुलगा शाळेसाठी उशीर होऊ लागला की आईवर चिडतो. का? तर आईने वेळेत कपडे, दप्तर काढून ठेवलं नाही. आणि आई त्याची मर्जी सांभाळण्यासाठी पळापळ करते. पण कधीही ‘झाला तर झाला उशीर’, असं म्हणत नाही किंवा ‘तुझं तू उशीर होऊ नये म्हणून प्रयत्न कर’, असंही सांगत नाही.
—-
अशा अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट जाणवते की आई-वडील मुलांसाठी काय वाट्टेल ते करायला तयार असतात आणि मुलं हा आपला हक्क समजतात. आईबाबांना वाटत असतं आता आपण एवढं दिलंय, एवढं सुखकर केलंय तर मुलं आनंदी राहतील, बरंच काही करू शकतील. पण असं होत नाही. मुलांच्या मागण्या संपत नाहीत. थांबत नाहीत. मग मला त्या मुलाला सगळं देणाऱ्या सफरचंदाच्या झाडाची गोष्ट आठवते. एक लहान मुलगा झाडाच्या सावलीत खेळत असे, झाडाशी गप्पा मारत असे, सफरचंद खात असे. झाडालाही तो फार आवडत असे. त्याला आनंदात पाहून झाडाला आनंद होत असे. हळूहळू तो मोठा झाला. झाडाकडे येणं कमी झालं. मग एकदा तो आला. झाडाला आनंद झाला. पण मुलगा निराश होता. त्याला पैसे हवे होते. झाड त्याला म्हणालं, “माझे सफरचंद तोंड आणि विकून पैसे मिळव.” मुलगा आनंदला. त्याने सफरचंद तोडले, पैसे मिळवले. नंतर परत काही दिवस तो आलाच नाही. मग जेंव्हा परत आला, तो निराश होता. आता त्याला घर बांधायचं होतं. झाडाने आता त्याला फांद्या दिल्या. असं करत झाड आपली एकेक गोष्ट मुलाला देत गेलं, आणि मुलगा हक्काने घेत गेला. अशी काहीशी ती गोष्ट आहे. देण्याचं समर्थन करणारी. मुलाला आनंदी ठेवण्यासाठी त्याग करणाऱ्या, सतत देणाऱ्या झाडाची. अनेक आईवडील ह्या झाडाच्या भूमिकेत जाऊ पाहतात. आपल्या मुलाला सगळं द्यायचं. जे आपल्याला मिळालं नाही ते पण द्यायचं. त्याच्यासाठी दिवसरात्र झटायचं. विचार खरंच छान आहेत;पण ह्या त्यागाची मुलाला जाणीव आहे का?कुठेतरी आपण थांबायला हवं, हे मुलाला समजतं का? मुळांत ‘आपल्या जगण्यासाठी, आपल्या यशपयशासाठी, आपल्या आनंदासाठी आपले आईवडील नाहीत, तर आपण जबाबदार आहोत,’ हे त्याला कळतंय का? हा विचार आईवडील म्हणून आपणच करायला हवा. आणि देणं, करणं थांबवायला हवं.