यशाची भीती

अपयशाची नाही तर कधीकधी यशाचीच भीती वाटू लागते. पुढे पाऊल टाकताना अनेक विचार मनात डोकावतात. ‘जमेल का मला सगळं बदललेलं? आहे का मी एवढा सक्षम? ती वाढलेली जबाबदारी घेऊ शकेन का ? हे सगळं छान रुटीन, मुख्य म्हणजे माझा कम्फर्ट झोन सगळं सोडावं लागेल. सगळंच बदलत जाईल.’ बदलण्याची ही कल्पना क्षणोक्षणी घाबरवून टाकते. यश कितीही मोहक असलं तरीही. आणि मग आपणच ते लांबणीवर टाकू लागतो.
यशाची भीती म्हणजे यश मिळाल्यानंतरच्या परिणामाची भीती. लोक काय म्हणतील, जवळचे दुरावतील असाही विचार असतो कधीतरी. काही करावसं वाटत नाहीये मला इथून सुरुवात होते कधीकधी आणि मिळाला होता चान्स पण शेवटच्या क्षणी मीच नाही गेलो इथपर्यंत जातं सगळं.बरेचदा, सुरुवातच नाही करता येत नव्या गोष्टींची. सुरुवात झाली तर मधूनच थांबून जातात. मोटिवेशनच नाहीये मला असंही सांगतं कुणीतरी, कधीतरी. कधीकधी तर अगदी कळस होतो, ‘मी खरंच हे सगळं मिळण्याच्या लायकीचा आहे का?’ असा प्रश्न पडतो. तुम्हाला भरभरून यश देणाऱ्या संधि असताना तुम्हीच नाकारत जाता सगळं आणि समाधानी आयुष्यही. कारण तुमच्या क्षमतेपेक्षा खूप आधी तुम्ही थांबता.
असं होतं. अनेकांच्या बाबतीत होतं. यशाकडे नेणारा मार्ग अवघड असणारच. पण हा मार्ग म्हणजे शेवट नाही. त्याला घाबरून, थांबून चालणार नाही. नाकारूनही चालणार नाही. यशाबद्दलचे तुमचे विचार एकदा तपासून पहा. बदल फक्त आपरिहार्यच नाही तर मोहकसुद्धा असतो हे लक्षात घ्या.
मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *