थोडाफार हट्टीपणा, मोठ्यांचे न ऐकणे, कधी चिडचिड, मोठ्यांशी वाद घालणे, उलट बोलणे, ह्या गोष्टी सगळीच मुलं कधी ना कधी करतात. अगदी लहान वयांत (2-3 वर्षांची मुलं) आणि किशोरवयांत ह्या गोष्टी प्रकर्षाने होतात. मधला काही काळ मात्र बहुतेक (4 to 11 years) मुलं नियम पाळतात. सांगितलेले ऐकतात.
काही मुलांच्या बाबतीत मात्र हे नेहमीच सुरू असतं. त्यांच्यासाठी बनवलेले नियम त्यांना मान्य नसतात. मग अगदी क्षुल्लक कारणावरून रडारड, मोठ्या माणसांशी अपमानास्पद बोलणे, चिडून बोलणे, पटकन आणि टोकाचा राग, सतत स्पर्धा करण्याची वृत्ती, सतत भांडण ह्या गोष्टी घडू लागतात. मूड सतत रडवेला असतो. ह्या गोष्टी जर मुलांमध्ये सहा महिने किंवा जास्त काळापासून दिसून येत असतील तर पालकांनी सजग व्हायला हवं. मुलांना oppositional defiant disorder असू शकतो. मुलासाठी अशावेळी मदत घ्यायला हवी.
हे फक्त घरातच होईल असं नाही, तर काहीवेळेस शाळेतूनही अशा तक्रारी येऊ शकतात. काहीवेळेस मित्रांशी जुळवून घेणेसुद्धा अवघड जाते.
मुलांच्या अशा वागण्यामागे नक्की कारण काय? हे सांगता येणं तसं अवघड आहे. जैविक, आनुवंशिक किंवा घरातलं आणि मित्रांमधलं वातावरण ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असू शकतो. किंवा काहीवेळेस ह्यांपैकी एखादं कारणही असेल.
एक मात्र नक्की, की जेंव्हा मुलांमध्ये अशा समस्या दिसून येतात, तेंव्हा कुठेतरी बालक-पालक संवाद चुकीच्या दिशेने सुरू असतो. कधी कधी थांबलेलाच असतो.
बरेचदा, ‘मूलच आहे, त्याला काय कळतं.. मोठा झाला की वागेल नीट.” असं म्हणून मुलांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. खरंतर, ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. ह्यांतूनच पुढे मुलं गुन्हेगारी वृत्तीकडे वाळू शकतात.
पालकांना मुलांशी संवाद कसा साधायचा हे शिकवणं, मुलांना भावना व्यक्त कशा करायच्या ह्याचं शिक्षण देणं, बोलतं करणं, समस्या सोडवायला शिकवणं, शिक्षा आणि प्रेम ह्यांचा समतोल साधणं मुलांचं वागणं सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरतं.
– वसुधा देशपांडे-कोरडे
M.A.(Clinical Psychology), M.Sc.(Psychology)(UK), MBA(HR)(UK).
माइंडमास्टर कौंसेलर्स, पुणे