Sibling Rivalry
ज्या घरांमध्ये दोन भावंडं असतात त्या घरांमध्ये आई-वडिलांना सतावणारा एक प्रश्न असतो,’मुलांची भांडणे’. तसं पाहिलं तर भावा-बहिणीशी होणारी ही छोटी-मोठी भांडणं म्हणजे मजा असते. पण बरेच आई-बाबा ह्या गोष्टीमुळे वैतागतात. त्रासलेले असतात. ह्या भांडणाचे मूळ कारण कुठे येते?
मुलांची भांडणे होण्याचे कारण म्हणजे दोन्ही मुलांना वेगवेगळ्या प्रकारे स्वत:ला सिद्ध करायचे असते. अशावेळी जेंव्हा दोन मुलांमध्ये तुलना केली जाते, तेंव्हाही कुणी तरी एकजण दुखावले जाते आणि भांवडाबद्दल असूया, राग डोक्यात बसतो. “तुला माझं काहीच आवडत नाही.” असं बरेचदा मुलं म्हणतात. कारण मनात कुठेतरी असुरक्षितता असते. दोन भावंडाच्या स्वभावात, हुशारीत, आवडी-निवडींमध्ये खूप फरक असेल तरीही अशा प्रकारे तुलना आणि भांडणे होण्याची शक्यता असते.
दोन मुले होऊ देणे हा निर्णय बरेचदा, काही ठराविक कारणाने घेतला जातो, मुलगाच हवा किंवा मुलगीच हवी , हे कारण असतं. कधी, दुसरं मूल हवं कि नको, हा विचार करायलाही वेळ मिळत नाही. तर कधी, सासू-सासरे, नातेवाईक, मित्र-मंडळी सांगतात, ‘अजून एक होऊ द्या, एकाला दोघे असलेले बरे’, दुसरं मुल जन्माला येतं ते पहिल्याला कुणीतरी खेळायला हवं म्हणून, घराण्याला कुलदीपक हवा म्हणून किंवा तुमच्याकडून चूक झाली म्हणून. कारण काहीही असू देत, दुसरे मुल होणे हि गोष्ट थोरल्या मुलासाठी बरेचदा त्रासदायक ठरते. त्याला एक प्रकारची असुरक्षितता वाटू लागते. एवढे दिवस त्याला मिळणारे आई-बाबांचे, इतर कुटुंबियांचे प्रेम, लक्ष आता धाकट्या भावंडाला मिळू लागते. आणि मग एक प्रकारची असूया मनात घर करू लागते. मग बरेचदा, मोठी मुले लहानांना त्रास देतात. तर कधी भावंडाला त्रास न देता आईवरच चिडचिड करू लागतात. लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करू लागतात. काहीवेळेस त्रासदायक होत जातात.
आम्हाला मूल होऊ द्यायचे आहे कारण आम्हाला त्याला सांभाळायचे आहे, मुल वाढवताना मिळणारा आनंद पुन्हा एकदा हवा आहे, असाही विचार असतो. हा विचार जेंव्हा येतो, तेंव्हा दोन्ही मुलांना ती आहेत तसे स्वीकारले जाण्याचे चान्सेस वाढतात.
रिसर्चनुसार सिद्ध झाले आहे, जेंव्हा मुलांमध्ये दोन ते चार वर्षे एवढे अंतर असते तेंव्हा भांडणे होण्याची शक्यता जास्त असते, कारण दोघांनाही आई-वडिलांनी लक्ष देण्याची गरज असते. मोठे मूल ह्याच काळात जरासे स्वतंत्र होत असते. आपल्याला एखादी वस्तू, आई मिळत नाहीये हे त्याला कळू लागलेले असते. अंतर कमी असल्यानंतर मात्र मोठ्या मुलाला दुसऱ्या बाळाच्या येण्याने फारसा फरक पडत नाही. मग दोघंही एकमेकांचे छान मित्र होऊ शकतात. भावंडामधील अंतर पाच वर्ष किंवा जास्त असेल तर मोठे मूल आईसाठी मदतीचा हात बनते. आणि धाकट्या भावंडासाठी आधार.
आई-वडील म्हणून ह्या भांडणामध्ये आपण काय करू शकतो?
- धाकटे मुल जन्माला येण्यापूर्वी, मोठ्या मुलाच्या मनाची तयारी करणे. येणारं बाळ आई-बाबांना आणि तुलाही आनंद देणारं असणार आहे, हे सांगणे. हे सांगतानाच तुलापण त्याला/तिला छान सांभाळायचं आहे हे सांगणं महत्त्वाचे आहे.
- धाकटे मुल हे फक्त मोठ्याला सोबत म्हणून नाही, तर त्याची स्वत:ची ओळख घेऊन येणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे. आपली दोन्ही मुलं वेगवेगळी आहेत हे लक्षात घ्यायला हवं. दोन्ही मुलांचे वेगळेपण जोपासायला मदत करायला हवी.
- मुलांची भांडणे त्यांची त्यांनाच सोडवू द्या. मुलांच्या भांडणामध्ये तुम्ही पडलात तर ती सोडवण्यापेक्षा तक्रारी वाढत जातात. तुम्हीही वैतागता आणि मुलंही. जोपर्यंत अगदी धोकादायक प्रकाराला सुरुवात होत नाही तोपर्यंत भांडणे त्यांची त्यांनाच सोडवू द्या. आणि सोडविण्याची वेळ आलीच तर, भांडणामध्ये नक्की कुणाचा दोष आहे. हे शोधणे टाळा. कुणा एकाचीच बाजू घेणे टाळा. जर शिक्षा करायची असेल तर दोघानाही सारखीच शिक्षा करा.
- अशावेळी दोघानाही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पाठविणे हा उत्तम उपाय आहे.
- दोन्ही मुलांबरोबर वेगवेगळा आणि एकत्र quality time घालवा आणि मुलांना साधा-भोळा, खोडकर अशी विशेषणे देणे टाळा.
- घरात सर्वासाठी सारखेच असे काही नियम ठरवलेले असणे, आणि ते पाळले जाणे आवश्यक आहे.
जेंव्हा दोन मुलांपैकी कुणीतरी एक, थोडासा बौद्धिक किंवा शारीरिक दृष्ट्या दुबळा असतो, तेंव्हा आई-वडिलांचं त्या दुबळ्या मुलाकडे जास्त लक्ष असतं. देणं आवश्यक असतं. अशावेळी, दुसऱ्या मुलाच्या वयानुसार त्याला परिस्थितीचे भान देणे आवश्यक आहे. जे मुल दुबळे आहे त्यालाही शक्य तेवढी नॉर्मल वागणूक द्यायला हवी. सगळ्यांनी मिळून घरात एकत्र आनंदात राहता येते हे शिकवायला हवे. अशावेळी सुद्धा त्यांची होणारी छोटी-छोटी भांडणे त्यांनाच सोडवू द्यावी.
अशावेळी , अजून एक गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे दुबळ्या मुलापायी दुसऱ्या मुलाच्या भावनिक गरजा पूर्ण न होणे. असे झाले तर मनात कुठेतरी आई-वडिलांबद्दल नाराजी राहते. त्या भावंडाबद्दल असूया राहते. तेंव्हा त्याच्याही भावनिक गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष द्यायला हवे.
मुलांची भांडणे होताना तुम्ही स्वत: शांत राहण्याची गरज आहे, हेही लक्षात असू द्या. बरेचदा, भांडणं, वाद टोकाला जातात. कुणा एकासाठी खूप जास्त शारीरिक किंवा मानसिक रित्या त्रासदायक ठरू लागतात. आत्मविश्वासासाठी घातक ठरतात. अशावेळी त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
-वसुधा देशपांडे-कोरडे
M.A. (Clinical Psychology), M.Sc. (Psychology)(UK), M.B.A. (HR)(UK))
Mindmaster Counsellors, Pune.
9225505369