“ए mentally retarded आहे का रे तू जरा…” माझ्या अगदी समोरच बसलेल्या दोन मुलांचा संवाद अगदी सहज कानावर पडत होता. mentally retarded हा शब्द चेष्टेच्या स्वरुपात अनेकदा वापरला जातो. बरेचदा, शाळेत शिक्षकही अभ्यास न जमणाऱ्या एखाद्या मुलाला Intellectually disabled असं लेबल लावून देतात.
खरंतर हा अजिबातच चेष्टेचा विषय नाही.
mentally retrded ह्या शब्दांऐवजी हल्ली क्लीनिकल डायग्नोसीस देताना ‘intellectually disabled’ असं म्हटलं जातं. ज्या मुलांचा IQ ७० पेक्षा कमी असतो अशी मुलं intellectually disabled समजली जातात. ह्या मुलांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २-३% एवढेच आहे. IQ कमी असणं ह्यांत चेष्टा करण्यासारखं किंवा कमी लेखण्यासारखे निश्चितच काही नाही. तरीही, ह्या मुलांना आजूबाजूच्या लोकांकडून एकतर सहानुभूतीच्या नजरेतून पाहिलं जातं किंवा त्यांच्या वागण्या-बोलण्याची चेष्टा केली जाते. हि मुलं आपल्यापेक्षा वेगळी असतात हे समजूनच घेतलं जात नाही.
हि मुलं आणि त्यांचे आई-बाबा नेमके कोणत्या परिस्थतीतून जातायत हेच अनेकांना माहिती नसतं. Intellectual disability मध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी जाणवतात एक म्हणजे, IQ नॉर्मल मुलांपेक्षा कमी असल्याने, निर्णय घेणे, अडचणींवर मार्ग शोधणे, उत्सुकता वाटणे, स्वत: काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे ह्यांत ही मुले मागे पडतात. दुसरे म्हणजे विकास कमी गतीने होत असतो. म्हणजे, रांगणे, चालणे, बोलणे ह्यागोष्टी करण्यासाठी त्यांना वेळ लागतो. मग इतरांशी संवाद साधताना, स्वत:च स्वत:ची काळजी घेताना, स्वावलंबी होताना ह्या मुलांना अडथळे जाणवतात. बरेचदा काही शारीरिक तक्रारीही असतात.
जेंव्हा आपल्या मुलाची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी वेगाने होतीये हे जाणवतं तेंव्हा लगेचच तज्ञांचा सल्ला घेतला जायला हवा. तसेच नॉर्मल वाढ कशी होते हेही लक्षात घेतले जावे. म्हणजे शेजारचा मुलगा १०व्या महिन्यात चालला पण माझा १२व्या महिन्यात चालायला लागला म्हणजे माझा मुलगा मतीमंद आहे असे नाही. पण माझा मुलगा २-२.५ वर्षाचा झाला तरीही चालत नाहीये म्हटल्यावर सल्ला घ्यायला हवा. चालणे, बोलणे, आजूबाजूचा परिसर, माणसे ओळखणे त्याच्याशी adjust होणे हे विकासाचे काही महत्त्वाचे भाग आहेत. मुलाचा IQ आणि विकास तपासणे हे intellectual disability ओळखण्यासाठी गरजेचे आहे.
Intellectual disability वयाबरोबर आपोआप जाईल असा काही पालकांचा समज असतो. पण असं होत नाही. “त्याचे बाबा पण उशिरा चालले, उशिरा बोलले तसंच ह्याचं होईल” असं काही आज्ज्यांचे म्हणणे असते पण ते दिशाभूल करणारे ठरू शकते. Intellectual Disability असली तरीही मुलांना काही गोष्टी शिकवता येतात, हे नक्की.
त्यांना शिकविण्यासाठी पेशन्सची गरज असते. Disabilityची तीव्रता जेवढी जास्त तेवढे शिकविण्यासाठी परीश्रम जास्त. ह्या मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकविण्याची गरज असते. तशा शाळा, शिक्षक उपलब्ध आहेत. बरेचदा, ह्या मुलांना नॉर्मल शाळेतच घातले जाते. तिथे शिकण्यापेक्षा हि मुलं फ्रस्ट्रेट होण्याची शक्यता असते.
ह्या मुलांना नावे ठेवण्यापेक्षा स्वीकारणे. सांभाळणे, शिकविणे, स्वतंत्र बनविणे आवश्यक आहे. त्यांना जेवढे नॉर्मल पद्धतीने वागवले जाईल तेवढी त्यांच्यात सुधारणा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे चुकल्यावर रागावणे, एखाद्या गोष्टीसाठी नकार देणे, घरातली छोटी-मोठी, झेपतील अशी कामे करू देणे गरजेचे आहे. त्यातून त्यांचा आत्मविश्वासही वाढू शकतो.
Iintellectual disability असण्यामागे अनेक कारणे असतात. काही जेनेटिक समस्या तसेच मुलांची काही मोठी आजारपणे, प्रेग्नन्सीत आईने काही घातक औषधे घेणे ह्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. मुलं Intellectually disabled असतील तर त्यांत मुलांना वाढवितानाच्या पद्धतीत त्रुटी असण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यांना स्वतंत्र बनविण्यासाठीमात्र आई-बाबा महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.
वसुधा देशपांडे-कोरडे
M.A. (Clinical Psychology), M.Sc. (Psychology)(UK), MBA (HR)(UK)
माइंडमास्टर कौन्सेलर्स, बिबवेवाडी, पुणे
९२२५५०५३६९