काही दिवसांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. ५ ते १०वर्षे वयाची मुलं एका खोलीत बसलेली होती आणि प्रत्येकाच्या हातात आईचा मोबाईल होता. जवळपास १.५ ते २ तास पूर्ण शांतता होती. मोबाईल हातातून काढला किंवा काही प्रॉब्लेम आलाच तरच फक्त किंकाळी मारली जात होती.
५ ते दहा वयोगटातल्या मुलांनी एवढा वेळ शांत बसणेकुणालाही आक्षेपार्ह वाटत नव्हते. उलट बघ कसा पटापट बोटं फिरवतो ह्याचं कौतुकच वाटत होतं.
मध्ये असंच एकदा ब्युटी पार्लर मध्ये गेले होते, त्या ब्युटीशियनची बोलताही न येणारी मुलगी स्मार्ट फोन सोबत खेळत होती. तिने तो बाजूला ठेवला आणि दुसरीकडे कुठ जाऊ लागली कि, हि(ब्युटीशियन) तिला बोलवायची आणि फोन हातात द्यायची.
स्मार्ट फोन हे आई-वडिलांसाठी मुलांना सांभाळण्याचे उत्तम माध्यम झाले आहे. फोन हातात दिला कि काय जेवतोय तेही मुलाला कळत नाही, कुणी बोलायला, सोबत करायला, खेळायला नसलं तरी चालते. मग काय सर्रास वापरायचा.
मध्ये एका आठ आणि दहा वर्षाच्या दोन बहिणींच्या आईने सांगितले होते, “आता मी दोन मुलीसाठी दोन वेगवेगळे i-pads घेतलेत. उगाच त्यावरून दोघींची भांडणं नको.”
मग हळूहळू मुलाचा चीडचीडेपणा, अभ्यासात लक्ष न लागणे, कुणाशीच न बोलणे ह्या गोष्टी दिसू लागतात. हार्वर्ड युनिवर्सिटीतल्या एका अभ्यासानुसार
स्मार्ट फोन्स मुळे मुलांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. मुलाच्या सामाजिक कौशल्यांवर सुद्धा स्मार्ट फोन्स मुळे परिणाम होतो.
मुलाच्या वयाची पहिली पाच वर्षं त्याला निरनिराळ्या गोष्टी दाखवणे, गप्पा मारणे, कागद, पेनने रेघोट्या ओढू देणे, चित्र काढणे उड्या मारणे आवश्यक असते. मुलं मोठी होऊ लागतात तेंव्हाही मित्र-मैत्रिणींशी गप्पा, खेळ, रंगवणे, हात-पाय मातीत चिखलात मळणे ह्या गोष्टी त्यांच्या वाढीच्या दृष्टीने आवश्यक असतात. स्मार्ट फोन्स चा अति वापर मुलांचं चैतन्यच हिरावून घेतो. मघाशीच कुठेतरी छान वाक्य वाचलं, बहुदा व.पु. काळेचं होतं, ‘ योग्य वयांत योग्य त्या गोष्टी व्हायलाच हव्यात म्हणजे मन आणि बुद्धी दोन्हीही शांत राहते.’ स्मार्ट फोन्स ह्याच्या आड येतायत.