प्रसंग १ – “समजा शाळेसाठी आवरताना तुला उशीर होतोय. तर तू काय करशील?”परवा एका लहानग्याला हा प्रश्न विचारला. “मी काहीच करणार नाही. बाबा शाळेत सोडेल फास्ट गाडीवरून..” मला हसू आलं. मग जाणवलं. मागेही अनेकवेळेस मला सहा-सात वर्षांच्या मुलांकडून हेच उत्तर येतं. उशीर होत असेल तर पटपट आवरायचं हे त्यांच्यापर्यंत न पोहोचता, ‘बाबा किंवा आई सोडेल’, हे पोहोचतं. मुलाला शाळेला उशीर होणं हि गोष्ट मुलापेक्षा आपल्यासाठी जास्त त्रासदायक असते
प्रसंग-२ “समजा तुम्ही होमवर्क करण्याची आठवणच नाही करून दिली तर काय होतं?” मुलांच्या आयांना(आईचे अनेकवचन) हा प्रश्न विचारला कि आधी त्याच गडबडतात. म्हणतात, “नाही असं कधी झालंच नाहीये आत्तापर्यंत. मला वाटतं असं व्हायला पण नको. उगाच त्याला/तिला शिक्षा. डायरीत नोट येते, insulting वाटतं.”
हे दोन प्रसंग हल्ली वारंवार घडतात. वाक्यांमध्ये थोडाफार फरक असतो पण मतितार्थ हाच असतो.
आपल्या मुलाला शिक्षा होणं. आपल्या मुलाला कुणी वाईट म्हणणं हि गोष्ट आपल्याला सगळ्यांत जास्त लागते. insulting वाटते. मलाही वाटते. काही दिवसांपूर्वी असाच एक प्रसंग माझ्या मुलीच्या बाबतीत झाला आणि मला भयंकर insulting वाटलं. तो प्रसंग इथे देण्यात अर्थ नाही. पण त्याची कारणमीमांसा करायची झाली तर कुठे तरी असं वाटत असतं, “आई म्हणून मी चुकू नये. माझी मुलं म्हणजे माझा आरसा. ती चुकतात ह्याचा अर्थ मी चुकते.” आणि एवढी काळजी घेऊन आपण चुकलो, हेच मनाला लागतं. आपण अजून मोजून-मापून वागण्याचा प्रयत्न करतो. मुलांनी चुकू नये ह्याची आधीच काळजी घेऊ लागतो. मुलांची अनेक कामे आपणच करू लागतो. ह्या सगळ्यांतून मुलांना काहीतरी शिकवायला स्कोप आहे. हेच विसरतो. कधीकधी आई असून सुद्धा वेड्यासारखं वागतो. मीही वागते, वागलेय. पण इथे आपल्यालाही शिकायला स्कोप आहे, हे लक्षात आलं आणि बदलले.
आपण जेंव्हा मुलांना होणारा त्रास आधीच ओळखून दूर करण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा मुलांना एक आयते, सरळ-सोपे आयुष्य दिले जाते. ‘मला झालेला त्रास त्याला होवू नये हाही एक विचार असतो.’
दुसरी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये आपण गरजेपेक्षा जास्त involve झालेले असतो. जेंव्हा असं होतं तेंव्हा प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट मोठी वाटू लागते. तेवढं एकच आपल्यासाठी ध्येय बनतं. त्या नादात मुलाला खरंतर develop करायचंय हे आपल्या लक्षातच येत नाही.
मग गे साधे-सोपे आयुष्य मिळाल्याने थोड्याश्या त्रासदायक गोष्टी खूप जास्त त्रासदायक वाटू लागतात. ताण सहन करण्याची क्षमता कमी होत जाते. गृहीत धरणे, चिडचिडेपणा वाढत जातो. सोपं आयुष्य हा अधिकार वाटू लागतो.
अशा insulting वाटणाऱ्या, त्रास होणाऱ्या, शिक्षा वाटणाऱ्या परिस्थितीतूनच आपली मुलं शिकणार आहेत. आपणही असेच शिकलो आहोत. ठेच लागूनच शहाणे झालो आहोत. मुलं अजून लहान आहेत, त्यांना चुकण्याचा पूर्ण अधिकार आहे, (आपल्यालाही आहे). होणाऱ्या परिणामांना सामोरे जाणे हा शिकण्याचा उत्तम मार्ग. मोठी झाल्यानंतरची मुलं ह्या अनुभवातून जाऊन वेगळी असणार आहेत. त्यामुळे मुलांचे अपमान, मुलांच्या शिक्षा चुकाविण्यापेक्षा त्यांना भोगू द्या. परिणामाची जबाबदारी घेऊ द्या. शिकू द्या.
-वसुधा देशपांडे-कोरडे
M.A. (Clinical Psychology), M.Sc. (Psychology)(UK), MBA(HR)(UK)
Mind Master Counsellors, Pune.