प्रयत्न करण्याची मानसिकता- ग्रोव्थ माइंडसेट

हल्ली आई-बाबांकडून एक  वाक्य नेहमी ऐकायला येतं, ‘तसा तो हुशार आहे,पण एखादी गोष्ट जमली नाही न कि  पटकन सोडून देतो. प्रयत्नच करत नाही.’ ह्या वागण्याचं मूळ कुठे येतं ?

मानसिकता -mindset. विचार करण्याची ठराविक पद्धत. Carol Dweck ने ह्या विषयाचा अभ्यास केला. तिने दोन प्रकारचे mindsets सांगितले. Growth Mindset आणि फिक्स्ड mindset.

फिक्स्ड mindset म्हणजे आपण आहोत तसेच राहणार आहोत अशी मानसिकता. म्हणजे आपण हुशार आहोत म्हणजे आपल्याला सगळं यायलाच हवं. येतंच. आणि मठ्ठ आहोत म्हणजे आपल्याला कधीच काहीच समजणार नाही. असा पक्का ग्रह करून वागणे आणि त्याच दृष्टीने विचार करणे म्हणजे फिक्स्ड mindset असणे. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल असा फिक्स्ड mindset असतो तेव्हा प्रगतीच्या संधी कमी होत जातात. परिस्थितीपुढे शरणागती पत्करली जाते. हार मानली जाते आणि नकारात्मक भावनांना सुरुवात होते.

जेंव्हा मुलं लवकर प्रयत्न थांबवतात, हार मानतात सोडून देतात तेंव्हा त्यांना मनातून आपल्याला जमणार नाही हे पटलेलं असतं. ‘प्रयत्नाने जमू शकेल,’ असं वाटतंच नाही. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केलीच जात नाही. थोडक्यात फिक्स्ड माइंडसेट असतो.

जेव्हा फिक्स्ड माइंडसेट असतो, तेंव्हा कुणाला तरी काहीतरी सिद्ध करून दाखविण्याची खुमखुमी असते.  आपलं यश मग काही ठराविक गोष्टींमधून मोजायला सुरुवात होते. वर्गात पहिलं येणे, चांगली नोकरी ह्या गोष्टींचा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आधार घेतला जातो. एकदा सिद्ध करून झालं कि माणूस थांबतो. किंवा सिद्ध करता येत नाही म्हणजे माझ्यात काही गुणच नाहीत, मला हे जमणारच  नाही  असं म्हणून प्रयत्न सोडून देतो.  आपल्या क्षमतांना कुलूप लावून टाकतो.

मुलांचा असा माइंडसेट तयार होण्यामागे पालकत्व हि गोष्ट फार महत्त्वाची ठरते. पालकांची मानसिकता जर फिक्स्ड असेल तर मुलंही तसंच शिकतात. म्हणजे मुलगा हुशार आहे ह्याबद्दल जर तुम्ही मुलाचं वारेमाप कौतुक करत असाल तर तुम्हीच कुठेतरी मेहनतीला कमी लेखताय. मुलाने एखादी गोष्ट मिळवल्यानंतर हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे, असं न सांगता तुम्ही म्हणता. ‘हुशारच आहेस तू’.

दुसऱ्या एखाद्या मुलाचं कौतुक करतानाही आपण कसं करतो. ‘तो हुशार आहे ना, छान मार्क्स मिळाले..’ ह्यांत परत त्याची मेहनत दुर्लक्षित राहते.

मुलाचं चुकलं कि आपण लेबल लावून मोकळे होते. ‘तुला ह्या गोष्टी कळत नाहीत’, आपण डिक्लेअर करून टाकतो. ‘जाऊ दे, तुला नाही जमणार’, असं सांगून मोकळे होतो. इथे फिक्स्ड माइंडसेट तयार होत असतो.

जेव्हा growth mindset असतो, तेव्हा चुकण्याची आणि चुकीतून शिकण्याची प्रक्रिया घडत असते. आपण आज कमी असलो तरी प्रयत्नाने वर येऊ असा विश्वास असतो. तेव्हा नकारात्मक मानसिकतेतून लवकर बाहेर पडता येते. प्रगती साधता येते.  अल्बर्ट आईनस्टाईन, स्टीफन हौकिंग हि ग्रोव्थ माइंडसेट असणारी उत्तम उदाहरणे आहेत. यशस्वी झालेल्या अनेक जणांची अशी मानसिकता दिसून येईल.

मग ग्रोव्थ माइंडसेट असणं म्हणजे मला सगळं जमणार आहे, असा विश्वास असणं का? नाही, ग्रोव्थ माइंडसेट असणं म्हणजे स्वत:ला किंवा मुलानाही एका ठराविक चाकोरीतून न पाहता, काहीतरी करता येऊ शकतं असा विश्वास ठेवणं.

कमतरता झाकून ठेवण्याऐवजी स्वीकारणं आणि त्यावर मात करता येऊ शकते,  आपण स्वत:ला विकसित करू शकतो ह्यावर विश्वास असणं. असे अनेक आपल्याच शाळेतील वर्गातील मट्ठ मुले आपल्याला आठवत असतील, जे आज आपल्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. ह्याचं कारणही, ग्रोव्थ माइंडसेट हे असू शकतं.

मुलांचा growth mindset तयार करायचा असेल तर त्याच्या चुकांना, हरण्याला स्वीकारा. चुकांमधून शिकता येतं हे त्यांना कळू द्या. मुलाच्या हुशारीचं कौतुक करण्यापेक्षा त्याच्या मेहनतीचं, कृतीचं कौतुक करा. ते काम किती महत्त्वाचं होतं हे मुलाला कळू द्या. अपयश आलेले असले तरीही मेहनतीचं कौतुक आपण नक्कीच करू शकतो.

 

मुलाला कामातील अडचणी आणि त्या सोडविण्याच्या पद्धती ह्याबद्दल बोलू द्या. थोडसं त्याचं त्याला ठरवू द्या. मुलं थोडीशी फ्रस्ट्रेट झाली तरीही हरकत नाही. त्या फ्रस्ट्रेशनला तोंड द्यायला तुम्ही त्याच्या सोबत राहू शकता. ‘तुला एखादा विषय जमत नाही’, असं म्हणण्यापेक्षा ‘आपण प्रयत्न करूयात’, असं म्हणा.

मुळांत तुम्हीही न जमणाऱ्या गोष्टी सोडून देण्यापेक्षा करून पहा. स्वत:च्या चुका शिकण्याची संधी समजा. मुलांपर्यतसुद्धा हि गोष्ट पोहोचवायला हरकत नाही.Growth mindset असला कि आपोआपच मेहनतीची तयारी होते. चिकाटीने एखादे काम केले जाते. यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता कुशाग्र असायलाच हवी असे नाही,पण प्रयत्नांची तयारी आणि चिकाटी मात्र गरजेची आहे.

मुलांना प्रेरित करायचं असेल तर फक्त मोठ्ठे लेक्चर देऊन चालणार नाही, त्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

 

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

1 Comment

  1. It’s an remarkable post for all the online visitors; they will obtain benefit from it I am sure.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *