माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा आई-बाबांना असं वाटतं, कि, मुलांनी शहाण्यासारखं वागावं. एका जागेवर स्वस्थ बसावं, उड्या मारू नयेत, पळापळी करू नये, शाळेतून निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेने शांतपणे चालावं. शाळेच्या आजूबाजूला मला नेहमी, “पळू नको.. ” अशी सूचना ऐकू येते.
काही दिवसांपूर्वी, सहजच बागेत गेले होते. तिथे पाच-सहा वर्षांची एक मुलगी जंगलजीम वर चढण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात त्या मुलीची आज्जी तिथे आली आणि तिला सांगू लागली. “वर नको जाउस, पडशील.” हल्ली supporting व्हील्स ची सायकल मुलांना देऊन मुलं पडू नयेत म्हणून सायकलीला धरून जाणारे आई-बाबा, आज्जी-आबा दिसतात.
मुलं पडली कि, “सांगितलं होतं ना पडशील म्हणून,” हे वाक्य ऐकू येतं. जणू काही पडून त्यांनी खूप मोठी चूक केलीये. मला नेहमी प्रश्न पडतो, खेळणे, उड्या मारणे, पडणे हे सगळं मुलांच्या बालपणातून वजा केलं तर उरतं तरी काय?
पळणे, सायकल चालविणे, दोरीवरच्या उड्या, जंगलजिम, लंगडी, बॉल फेकणे, batने बॉल मारणे, ह्या गोष्टी मुलांचे ग्रॉस मोटार स्किल्स विकसित करतात. हल्ली बरीच मुलं ह्या गोष्टीमध्ये मागे पडलेली दिसून येतात. बरेचदा, काळजी पोटी मुलांना ह्यागोष्टींपासून लांब ठेवलं जातं.
मुलं खूप थकतात हेही एक कारण असतं.(मुलांना येणारा थकवा बरेचदा आई-बाबा किंवा आजी-आजोबाच ठरवतात.) पूर्वी बालवाडी, अंगणवाडी(Nursery, junior kg,senior kg) म्हणजे फक्त खेळणे, चित्र काढणे, गाणी, गोष्टी असत आता हे चित्र बदलत चाललंय. मुलांना होमवर्क असतो, अक्षर काढणे, स्पेलिंग्स लिहिणे ह्या गोष्टींमध्ये खेळणे काहीसे मागेच पडते. कितीतरी ठिकाणी tuition साठी ग्राउंड बंद केले जाते.
खरंतर gross motor स्किल्स विकसित असणे, मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरते. gross motor skills म्हणजे संपूर्ण शरीराचा समन्वय साधण्यासाठी आवश्यक कौशल्य. पळणे, उड्या मारणे, ball फेकणे ह्या आणि अशा अनेक गोष्टी मुलांना शाळेच्या अभ्यासासाठी सहाय्य करत असतात. स्वत:च्या शरीराचा तोल सांभाळता येणं, एकाच जागेवर खूप काळ बसता येणे, शरीराच्या डाव्या बाजूकडून, उजव्या बाजूकडे हालचाल करता येणे, डोळ्यांनी पाहणे आणि त्याचवेळी हाताने लिहिणे, आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींबद्दल सजग असणे, ह्यागोष्टी शाळेत शिकताना खूप महत्वाच्या असतात.
संशोधनानंतर असं सिद्ध झालंय कि, शिक्षणाचा वेग वाढविण्यासाठी, मैदानी खेळ सहकार्य करतात. विकसित gross motor skills मेंदूची निकोप वाढ होण्यासाठी आवश्यक असतात. मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांचा फार उपयोग होतो.(Burns, O’ Callaghan, McDonell, & Rogers, 2004).लहान वयांत भरपूर पळापळी, उड्या मारणे, मैदानी खेळ खेळण्याचा मुलांच्या बौद्धिक वाढीवर सकारात्मक परिणाम होतो,(Sibley, २००२). फिनलंड येथे झालेल्या एका अभ्यासानुसार, ज्या मुलांची ग्रॉस मोटर स्किल्स पुरेशी विकसित झालेले नाहीत अशी मुले वाचन, गणित ह्या विषयांमध्येसुद्धा मागे पडलेली दिसून आली.
मुलांच्या अभ्यासासाठी सगळ्यांत आधी त्यांचा खेळ बंद केला जातो. पण खरंतर त्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं. खेळणे हि गोष्ट मुलांचं फक्त बालपण जपणारी नाही तर त्यांना भविष्याच्या दृष्टीने घडविणारी आहे.