आपल्या नवऱ्याचं जेव्हा बापमध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्याच्यात खूप फरक पडतो. जर तो मुलीचा बाप झाला तर मग विचारायलाच नको. आपण ज्याला चांगलं ओळखतो, असं आपल्याला वाटत असतं त्याची वेगळीच प्रेमळ, हळवी बाजू दिसू लागते.
मुलींसाठी बाबा म्हणजे काय हे सांगता येणं कठीण आहे. माझी मुलगी ३-४ वर्षांची असताना बाबासाठी पोळी करायची. अर्धीकच्ची पोळी बाबा आवडीने खायचा. म्हणायचा, “तुझ्याइतकी चांगली पोळी कुणालाच जमत नाही.” आता पोळीची quality सुधारलीये पण dialogue हेच असतात. त्याचं हे वाक्य झालं कि तिला मनापासून आनंद होतो. तिच्या चेहऱ्यावर न मावण्याइतका.
गेल्या अनेक वर्षांत बापलेकींच्या नात्यांमध्ये अनेक फरक पडले. प्रेम असलं तरी ते व्यक्त केलं जात नसे. हळूहळू मात्र हे चित्र बदलत गेलं. तरीही, अजूनही अनेक घरांमध्ये हे नातं दिसत नाही. मुली आणि बाबा ह्यांच्यामध्ये एक दरी असते. हि दरी मुलींच्या एकूण व्यक्तिमत्वावर परिणाम करते.
करियर निवडणे, यशस्वी होणे, योग्य जोडीदार निवडणे, संवाद साधणे, तणाव हाताळणे ह्या सगळ्याच गोष्टींवर बाबांशी असणाऱ्या नात्याचा परिणाम होतो.
बाबांचं मुलींमध्ये इन्व्हॉल्व्हड असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबा म्हणून आपलं मुलींवरती प्रेम असतंच. मुलींचंही असतं. त्या प्रेमाला वाट करून देणं गरजेचं आहे. मुलीचा मित्र होता येणं गरजेचं आहे. मुलीचा मित्र होण्यासाठी
मुलीसोबत वेळ घालवा. तुमच्या मुलीला आणि तुम्हाला आवडणाऱ्या सारख्या गोष्टी कोणत्या? ह्याचा विचार करा. नसतील तर त्या शोधा. ह्या गोष्टी तुम्हाला एकत्र वेळ घालवायला मदत करतील. मुली लहान असतील तर त्यांच्याशी खेळण्यासाठी आवर्जून वेळ काढा. मुलींना नवीन गोष्टी शिकवा. माझा नवरा आणि मुलगी नेहमी एकत्र स्वयंपाक करतात. तिला निरनिराळ्या गोष्टी शिकविणे हि त्या दोघांसाठीही आनंद देणारी गोष्ट असते. त्याबरोबर बाबा गाडी कशी लावायची, खिळा कसा ठोकायचा, सायकलच्या चाकात हवा कशी भरायची, टायर कसा बदलायचा अशा अनेक गोष्टी सांगत आणि शिकवत असतो. तेही ती एन्जॉय करते. असं काहीतरी नवं शिकवणं नातं मजबूत करतं.
‘बाबा भेटल्यावर सगळं बाबाला सांगावंसं वाटणं,’ हे मुलींसाठी जेवढं आनंद देणारं असतं तेवढंच बाबासाठीही. बाबाने ते व्यवस्थित ऐकून घ्यावं. बाबातुन मित्र तयार होण्यासाठी ते खूप गरजेचं असतं. तुमची प्रतिक्रिया , तुमचं मत मुलींसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यातूनच त्या विचार करायला शिकतात. म्हणून फक्त ऐकू नका त्यावर प्रतिसाद द्या. तिच्याशी गप्पा मारा. तुमचा तिच्यावर विश्वास आहे हे तिला कळू द्या. तर ती खूप काही करू शकेल.