आज्ञाधारक

Obedient Child=successful parent आणि disobedient child= failure

असं एक समीकरण आपल्या सगळ्यांच्या मनात पक्कं असतं. मुलाला अधिकाधिक आज्ञाधारक बनविण्याचा प्रयत्न ह्या समीकरणातून होत असतो.  “माझा मुलगा किंवा मुलगी मी सांगेन ते सगळं ऐकतो/ऐकते”, ह्या गोष्टीचं आईबाबांना फार कौतुक असतं. जेंव्हा आई-बाबा मुलांना घेऊन येतात तेंव्हा बरेचदा, “ह्याला आमचं ऐकायला सांगा,” हा सूर असतो.  अपेक्षा अशी असते कि, मुलाने बस म्हटलं कि बसावं, उठ म्हटलं कि उठावं.  मी सांगेन ते कपडे घालावेत, मी सांगेन तिथेच जावं. अशी मुलं खूप गोजिरवाणी, स्वच्छ आणि छान दिसतात. एका जागेवर बस म्हटलं कि बसतात. जसं सांगितलं तसंच लिहितात. जसं सांगितलं तसंच चित्र काढतात. थोडक्यात आपण सांगू ते ऐकतात.

मुलं अशी असली कि आई-बाबांना होणारा त्रास खूप वाचतो.  आपल्याकडे शाळांमध्येही अशा मुलांना छान मार्क्स मिळतात. कारण आज्ञेचे तंतोतत पालन करायला मुले शिकलेली असतात.

एका मर्यादेपर्यंत दिलेल्या सूचनांचे पालन होणे, केले जाणे शिक्षण घेण्यासाठी फायद्याचे असते. पण जेंव्हा स्वत: विचार करायचा असतो. तेंव्हा मात्र अशा मुलांना त्रास होऊ लागतो.  संशोधनानंतर असे सिद्ध झाले आहे कि जी मुले आज्ञांचे पालन करायला शिकलेली असतात ती स्वत:साठी उभे राहायला कमी पडतात. आणि मग त्यांचा सहज गैरफायदा घेतला जाऊ शकतो.  कारण त्यांना एखादी गोष्ट पटो अथवा न पटो मान्य करण्याची सवय लागलेली असते. मग कधी भीतीपोटी तर कधी काहीच न सुचल्यामुळे आज्ञा पाळल्या जातात. अपहरणकर्ते, मुलांवर अत्याचार करणारे ह्यांच्या दबावाला अशी मुले बळी पडू शकतात.

ह्या मुलांचा दुसरा सहज लक्षात न येण्यासारखा गुण म्हणजे ही मुले जबाबदारी घेताना कमी पडतात. ‘चुकले तरी चालेल पण आयुष्य मी माझ्या मर्जीनेच घालवेन’, हि धमक ह्यांच्यात नसते. म्हणून मग तुम्ही सांगाल तो मार्ग ती निवडतात. मग सगळी जबाबदारी दुसऱ्या(आज्ञा देणाऱ्या) माणसावर जाते.  जेंव्हा आज्ञा देणारा माणूस हा अशी जबाबदारी घ्यायला तयार असतो तेंव्हा आज्ञा पाळण्याचे प्रमाण वाढते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज्ञा पाळणाऱ्याने  स्वत: कडे कमीपणा घेतलेला असतो. मी म्हणजे त्या व्यक्तीपुढे काहीच नाही. कुणीच नाही. हे आपणच मान्य केले कि आत्मविश्वास आपोआपच कमी होऊ लागतो.

(बऱ्याच जणांना आज्ञाधारक मुलांबद्दल असे  वाचणे जड जात असेल. हे फक्त माझं निरीक्षण नाही मिलग्राम ह्या मानसशास्त्रज्ञाने हे सिद्ध केले आहे. त्याचा प्रयोग आणि निष्कर्ष येथे वाचा. )

आई-बाबांची गम्मत अशी असते कि त्यांना मुलांना आज्ञाधारकही बनवायचं असत आणि responsibleही. पण टोकाचे आज्ञाधारक वागणे आणि जबादारीची जाणीव  दोन्ही गोष्टी एकाच वेळी एकाच माणसामध्ये असणे तसे अशक्यच असते.

मग मुलांनी ऐकलंच नाही (आज्ञा पाळली नाही) तर  मुलं शिकणार कशी? मुलांना आम्ही नाही तर कोण सांगणार? म्हणून मी सांगेन तसं त्याने करायलाच हवं.  असं वाटणाऱ्या आई-बाबांनी मुलांना आज्ञा पाळायला नाही  विचार करायला,  निर्णय घ्यायला शिकवा.

कोणत्याही गोष्टीसाठी जेंव्हा नियम बनवले जातील तेंव्हा मुलांचा विचार विचारात घ्या. आपल्याला ‘नाही’ म्हणता येतं हे मुलांना कळू द्या.  मुलं जेंव्हा काही सांगत असतील, बोलत असतील तेंव्हा त्यांचे बोलणे ऐकून घ्या. नियम बनवताना शक्यतो दोघांच्याही फायद्याचा (मुल आणि पालक) विचार करा.  मुलांना त्यांचे मत मांडण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्याला निर्णय आणि त्या निर्णयांची जबाबदारी घेऊ द्या.

 

 

 

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *