मठ्ठ

मठ्ठ

तो- एक मठ्ठ मुलगा..आणि त्याची आई मुलाला कसं शिकवावं हे न समजलेली आई…आणि त्याचं भविष्य म्हणजे फक्त अंधार…

नुसताच मठ्ठ नाही तर बडबडाही…

अर्धा दिवस वर्गाबाहेरच जायचा.

गृहपाठ अपुरा, वह्या अपूर्ण..

विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर यायचेच नाही…

वर्गातही रोज उशिरा यायचा..

मास्तरांचा पारा चढायचा त्याला पाहून.

दिवसाआड आईला नोटीस दिली जायची. ‘मुलाकडे लक्ष द्या’, म्हणून पालकत्वाचे धडे दिले जायचे.

असा कसा होता तो?

आईला मात्र कळायचा.

वर्गात उशिरा जाणारा तिचा मुलगा त्याच्या एका अपंग मित्राला मदत करतोय. त्याला वर्गात पोहोचवून स्वत:च्या वर्गात जायला त्याला उशीर होतोय.

तिला कळायचं कि सत्तावीस गुणिले नउ किती, हे पटकन सांगता न येणाऱ्या तिच्या मुलाला कळत कि रिक्षावाल्या काकांच्या पायांत चप्पल नाहीये. किंवा शाळेची घंटा वाजविणाऱ्या मावशींना आज कसलातरी त्रास होतोय. तो आपल्यापरीने जमेल तसा कमी करण्याचा आपला मुलगा प्रयत्न करतोय.

तिला माहिती होतं कि सगळ्या विषयांत कमी मार्क्स घेणाऱ्या मुलाला शेकडोंनी सगळ्या वयोगटातले मित्र आहेत.

तिला त्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसत होता. कळत होता. अभ्यासात कमी पडणाऱ्या मुलाला समजून घेत स्वीकारत शिकवत होती ती. त्याचा चांगुलपणा जोपासत होती.

ती नेहमी म्हणायची त्याला, “तू खूप चांगला वागतोस. I am proud of you!” त्याने बळ मिळायचं त्याला. चांगलं वागण्यासाठी. मदत करण्यासाठी…

….पण तरीही तो  एक मठ्ठ मुलगा आणि  त्याची  आई म्हणजे मुलाला कसं शिकवावं हे न समजलेली, भरकटलेली आई…
-वसुधा देशपांडे-कोरडे

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *